Headlines

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎




बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेली चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, वड, पिंपळ यासारखी शेकडो मौल्यवान झाडे तसेच विविध औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर तोड केली आहे. यातील अनेक वृक्ष ७० ते ८० वर्षांहून अधिक जुने असून, पर्यावरणीय, जैवविविधता व व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते. विशेषतः चंदनासारख्या लाखो रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या वृक्षांची नियोजनबद्ध पद्धतीने व संगनमताने तोड करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित वृक्ष धरण, कालवा किंवा प्रकल्पाच्या इतर कोणत्याही घटकास अडथळा निर्माण करत नसतानाही त्यांची तोड केल्याचा दावा केला आहे. तसेच कोणतीही वैध प्रशासकीय मंजुरी, वन विभागाची पूर्वपरवानगी, पंचनामा, मूल्यांकन अहवाल किंवा कायदेशीर लिलाव प्रक्रिया न करता वृक्षतोड केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात काही लाकूड व्यापारी, कंत्राटदार तसेच संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या संगनमतातून वनसंपदेची अवैध विक्री करून शासनाच्या मालमत्तेचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. १५ वर्षांतील परवाने शोधावेत या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्यासाठी वन, महसूल, जलसंपदा आणि पोलिस विभागाचे एसआयटी नियुक्त करावी, मागील १५ वर्षांतील सर्व वृक्षतोड परवानग्या, पंचनामे, वाहतूक परवाने, लिलाव नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, दोषी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदार नागेश चव्हाण यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *