![]()
नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदेत पुन्हा एकदा दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘शिलवर’ माशाची भर पडली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा वैशिष्ट्यपूर्ण गावरान मासा मच्छीमारांच्या जाळ्यात आढळून आला असून, त्याचे वजन तब्बल 15 किलो आहे. धरणाच्या अथांग पाण्यातून सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात सापडलेल्या या अवाढव्य माशाची सध्या पैठण आणि परिसरातील मत्स्यप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. हा दुर्मिळ मासा व्यावसायिक रवी पल्हारे यांना मिळाला असून, स्थानिक बाजारात तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे. गोड पाण्यात आढळणारा ‘शिलवर’ मासा हा काटा नसलेला, अत्यंत चवदार आणि मऊ मांसासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्यांमध्ये या माशाला नेहमीच पहिली पसंती असते. मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण मच्छीमारांचे नेते बजरंग लिंबोरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरण परिसरात पूर्वी या प्रकारचा शिलवर मासा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत धरणातील प्रदूषण, बदलणारे हवामान आणि इतर कारणांमुळे या प्रजातीचे प्रमाण प्रचंड घटले आहे. त्यामुळे तब्बल वर्षभराच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एवढ्या मोठ्या आकाराचा शिलवर मासा सापडल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात 400 रुपये किलोचा भाव दुर्मिळता आणि अप्रतिम चव यामुळे या 15 किलोच्या शिलवर माशाला बाजारात येताच प्रचंड मागणी सुरू झाली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत या माशाला तब्बल 400 रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी भाव मिळत आहे. मासा बाजारात विक्रीसाठी येण्यापूर्वीच अनेक चोखंदळ ग्राहकांनी तो खरेदी करण्यासाठी दुकानदारांकडे आगाऊ (ॲडव्हान्स) बुकिंग नोंदवल्याचे पाहायला मिळाले. या दुर्मिळ माशाच्या एन्ट्रीमुळे जायकवाडीतील मरगळलेल्या मत्स्यव्यवसायाला पुन्हा एकदा अच्छे दिन येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धरणात नवीन मत्स्यबीज टाकण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जायकवाडी धरणात शासनाच्या वतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. परिणामी, धरणातील माशांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक रितीने कमी होत चालली आहे. पारंपरिक मच्छीमारांचे उपजीविकेचे साधन धोक्यात आले असून, धरणात तातडीने नव्याने दर्जेदार मत्स्यबीज सोडले जावे, यासाठी आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत.– बजरंग लिंबोरे (अध्यक्ष, जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समिती)
Source link
जायकवाडीत वर्षानंतर दुर्मिळ ‘शिलवर’ माशाची एन्ट्री:15 किलो वजनाचा गावरान मासा जाळ्यात, चवदार मांसामुळे बाजारात मोठी चर्चा