![]()
आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे पण या धोक्यातून वाचण्याचा उपाय राम कथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत केले याचे दाखले त्यात आहेत. मानवी जीवनातही अशा अनेक समस्या प्रत्येकाला येतात पण त्यामुळे हतबल न होता समर्थपणे त्यांचा सामना करण्याचा संदेश रामायणातून दिला गेला आहे असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. कुमार विश्वास यांनी केले. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काका ट्रस्टच्यावतीने डॉ. विश्वास यांची अपने अपने राम ही राम कथा आयोजित केली होती. कथेचे तिसरे पुष्प गुंफून समारोप करताना डॉ. विश्वास यांनी प्रभू श्रीरामांनी अनेक संकटांशी झुंज देत यश मिळवताना मानवी जीवनातही संकटांशी सामना करून यशस्वी होण्याचा संदेश दिला. नगरकर भाविकांना तीन दिवस राममय करून रामकथेची अद्भुत पर्वणी दिल्याबद्दल कथाकार डॉ. कुमार विश्वास यांचा सचिन जगताप व आ. संग्राम जगताप यांनी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती देऊन सन्मान केला. राष्ट्रीय पाठशाळेच्या मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून ही राम कथा भक्तिपूर्ण वातावरणात आयोजित केली होती. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास हभप जंगलेशास्त्री महाराज, आ. मोनिका राजळे, आ.हेमंत ओगले, डॉ. सुजय विखे, मनपा आयुक्त यशवंत डांगे, समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी आदी उपस्थित होते. काका ट्रस्ट व जगताप परिवाराच्यावतीने सुवर्णा जगताप, शीतल जगताप, डॉ. वंदना फाटके, राजेश भंडारी, अनिल मुरकुटे, गणेश गोंडाळ, नगरसेवक विकी जगताप, अजित जगताप, अनुप काळे, शशीकांत घीगे आदींनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. विश्वास म्हणाले,श्रीरामांनी कोणतेही देवत्व न दाखवता फक्त मानवी जीवनातील समस्या मिटवण्यासाठी कसा संघर्ष आवश्यक आहे हे आपल्या आदर्श जीवनातून दाखवून दिले. त्यांनी वनवास स्वीकारला, काट्याकुट्यातून मार्ग शोधला, बलाढ्य शत्रूशी लढताना वनवासी लोकांचे सहाय्य घेतले, शत्रूचा शरण आलेला भाऊ बिभीषणला लंकाधिश करण्याचे वचन दिले, शत्रूशी लढताना भावाचे व मित्रांचे सहाय्य घेतले आणि सर्वात महत्त्वाचे स्वतःच्या क्षमतेवर व शौर्यावर विश्वास ठेवला. मानवी जीवनातही अशा अनेक समस्या प्रत्येकाला येतात पण त्यामुळे हतबल न होता समर्थपणे त्यांचा सामना करण्याचा संदेश रामायणातून दिला गेला आहे, असे डॉ. विश्वास यांनी नमूद केले. ..तर आधी तुम्ही सत्य स्वीकारा सध्याच्या काळात प्रत्येकाची उपयोगिता पाहिली जाते व त्यामुळेच वृद्धाश्रम वाढत असल्याचे दुर्दैव आहे. तुम्ही आई-वडिलांसोबत राहिले नाही तर तुमची मुलेही तुमच्या समवेत राहणार नाहीत. हितसंबंध व सत्य स्वीकारण्याची वेळ आली तर सत्य स्वीकारा. स्वतः भगवान श्रीरामांनी त्यांच्या जीवनातून हे दाखवून दिले आहे.
Source link
जीवनामधील संकटांचा सामना करण्याचा संदेश रामायणाने दिला:डॉ. विश्वास यांचे प्रतिपादन, श्रीराम कथा सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद