Headlines

ज्ञानप्रबोधिनी, निगडीत 2 जुलैला 'अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर'चे उद्घाटन:ग्रामीण नवोपक्रम, उद्योजकता आणि समुदाय विकासाला मिळणार चालना




ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्रात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर – ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन (ACIC-JPIF)’ चे उद्घाटन २ जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MKCL) संस्थापक संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता मनोहर सभागृहात हा सोहळा पार पडेल. या केंद्राद्वारे ग्रामीण व निमशहरी भागातील युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी सक्षम व्यासपीठ मिळेल, अशी माहिती ज्ञानप्रबोधिनीचे विश्वस्त सुभाष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इनोव्हेशन सेंटरच्या संस्थापक संचालिका संगीता कुलकर्णी, मुख्य नवोपक्रम अधिकारी ओंकार गुर्जर, देसाई ब्रदर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पारेख आणि सीएसआर प्रमुख चंद्रकांत रावळ उपस्थित होते. देशपांडे यांनी सांगितले की, उद्घाटन सोहळ्याला अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, देसाई ब्रदर्स लिमिटेड, ज्ञान प्रबोधिनी, विविध शासकीय विभाग, संशोधन संस्था, स्टार्टअप परिसंस्था, उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या केंद्राचा मुख्य उद्देश केवळ स्टार्टअप उभारणीपुरता मर्यादित नसून, समुदायातील समस्यांवर आधारित नवकल्पनांना उद्योग, सामाजिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतरित करणे हा आहे. संगीता कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘समस्येपासून समाधानाकडे आणि समाधानापासून शाश्वत उद्योगाकडे’ या संकल्पनेवर आधारित ‘कम्युनिटी बेस्ड इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन प्रोग्रॅम’ राबवला जाईल. यात कल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत पूर्व-इन्क्युबेशन, इन्क्युबेशन आणि उद्योग विस्तार अशा टप्प्यांमध्ये उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल. या केंद्राद्वारे ग्रामीण युवक, स्वयं-सहाय्यता बचत गट, महिला उद्योजिका, शेतकरी उत्पादक संस्था, विद्यार्थी, संशोधक, सामाजिक उद्योजक, कारागीर आणि प्रथमच उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना विशेष प्राधान्य दिले जाईल. उपजीविका उद्योग, सामाजिक उद्यम आणि नवोपक्रमाधारित उद्योग अशा तीन स्वतंत्र उद्योजकता मार्गांद्वारे विविध घटकांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. ओंकार गुर्जर यांनी माहिती दिली की, बांबू आधारित उद्योग, कृषी व कृषी-जैवतंत्रज्ञान, औषधी वनस्पती, अन्न प्रक्रिया, न्यूट्रास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, महिला उद्योजकता, ग्रामीण उद्योग आणि सामाजिक नवोपक्रम या क्षेत्रांमध्ये उद्योगनिर्मितीला विशेष प्रोत्साहन दिले जाईल. उद्योजकांना डिझाईन थिंकिंग व उद्योजकता प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रोटोटाइप विकास, प्रयोगशाळा व मेकरस्पेस सुविधा, क्षेत्रीय चाचण्या, उद्योग व शासकीय संस्थांशी संपर्क, कायदेशीर व आर्थिक सल्ला, निधी व गुंतवणूकदारांशी जोडणी तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यापक परिसंस्था उभारण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *