Headlines

ठाकरे गटाला कोकणात धक्का?:वैभव नाईक एसीबीच्या रडारवर, मालमत्तेची माहिती मागवली; ‘जायंट किलर’ चौकशीच्या फेऱ्यात




कोकणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि माजी आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रत्नागिरी येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे. कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांबाबत तपशील मागवण्यात आला आहे. विशेषतः 2002 आणि 2006 या वर्षांत त्यांनी विकत घेतलेल्या दुकान गाळ्यांची माहिती एसीबीकडून तपासली जात आहे. संबंधित गाळे एक आहेत की दोन स्वतंत्र मालमत्ता आहेत, याची खातरजमा करण्यासाठी नगरपंचायतीकडे चौकशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नाईक यांच्याबाबतची चौकशी 2022 पासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी आपण मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आपली चौकशी सुरू असून इतर अनेक प्रकरणांतील चौकशा बंद झाल्या, मात्र स्वतःच्या बाबतीत तपास अद्याप सुरू असल्याने हा अन्याय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याविरोधात आपण कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा देणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, कोकणातील राजकारणात उद्धव ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांनीही ठाकरे गटाची साथ सोडली. बाळ माने हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत कोकणात ठाकरे गटाचे मोजके प्रभावी नेते उरले असून त्यामध्ये वैभव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यामुळे त्यांच्याभोवती सुरू झालेल्या चौकशीमुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे. वैभव नाईक हे कोकणातील जायंट किलर, म्हणून ओळखले जातात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव करून राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली होती. राणे आणि नाईक कुटुंबांमधील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. त्यानंतर वैभव नाईक सलग दोन वेळा कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि 10 वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र नीलेश राणे यांनी पराभूत केले. वैभव नाईक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या एसीबीकडून सुरू असलेल्या चौकशीमुळे वैभव नाईक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मालमत्तेशी संबंधित माहितीची पडताळणी सुरू असताना या तपासातून पुढे कोणते निष्कर्ष समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळासह कोकणातील नागरिकांचेही लक्ष लागले आहे. चौकशी सुरू असली तरी आपण निर्दोष असल्याचा दावा वैभव नाईक यांनी कायम ठेवला असून येणाऱ्या काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *