Headlines

नवनीत राणांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी? सुनेत्रा पवारांची भेट, फडणवीसांशी चर्चा:मिटकरींची सूचक पोस्ट, हालचालींना वेग




महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीचा राज्यसभा उमेदवारीशी संबंध असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा जागेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वातावरणही चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा वाढताच पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत पार्थ पवार यांच्या गटाचा प्रभाव वाढत असल्याचेही काही नेत्यांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळल्यानंतर ते फारसे सक्रिय दिसत नसल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्याबाबतही अस्वस्थतेच्या चर्चा सुरू असल्याने पक्षातील अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या राज्यसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून असल्याने इच्छुक नेत्यांनी हालचाली वाढवल्या आहेत. विविध स्तरांवर संपर्क, बैठका आणि चर्चा सुरू असून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत. पक्ष नेतृत्व अखेर कोणावर विश्वास दाखवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे विधान परिषद निवडणुकीत पक्षाबाहेरील विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर आता राज्यसभा जागेबाबत कोणता निर्णय घेतला जातो, यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नवनीत राणा या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. कालच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्याआधी त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागेवर त्यांची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अमोल मिटकरी यांनी केलेली पोस्टही चर्चेत दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्टही चर्चेत आली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली राज्यसभा जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि त्यावर इतरांनी दावा करू नये. पक्षात अजित पवार यांचे नेतृत्व अंतिम असून सुनेत्रा पवार आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तोच अंतिम मानला जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या जागेवर छगन भुजबळ, नवनीत राणा किंवा अन्य कोणाची निवड होते, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. आगामी काही दिवसांत होणारा निर्णय राज्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *