![]()
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून इंधन टंचाईचे संकट असून ग्रामीण भागात ऐन खरिपाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरची चाके शेतातच थांबली आहेत. रोटाव्हेटर आणि नांगरणीची कामे करण्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी बळीराजा आता शेत सोडून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभा आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जवळपास ३५० हून अधिक पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक आहेत. ग्रामीण भागातील पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी रात्री ११ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी कॅनच्या नंबरवरून वादावादी आणि हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रशासनाला आता पोलिस बंदोबस्ताची मागणी करावी लागत आहे. डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पूर्ण दिवस रांगेत जात असल्याने मशागतीचे नियोजन कोलमडले. गंगापूर तालुक्यात आठ दिवसांपासून डिझेल टंचाई असून, शहरापासून १० किमीपर्यंत चारही रस्त्यांवर २० पेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. प्रत्येक पंपावर ‘नो स्टॉक’च्या पाट्या आहेत. टँकर आल्यावर स्थानिकांसोबतच नेवासा, वैजापूर, पैठण, कन्नड तालुक्यातील वाहनधारक रांगा लावत आहेत. उंडणगाव परिसरात पहाटेपर्यंत पंपावर रांगा लागत आहेत. कॅनवरून वादावादीचे प्रकार वाढले आहेत. सोयगावला २४ तास वेटिंग आहे. कन्नड येथील पेट्रोल पंपचालक प्रकाश अग्रवाल म्हणाले, १७ हजार लिटर डिझेल ५ तासांत संपून जात आहे. गंगापूरमध्ये २० हून अधिक पंपांवर वाहनधारकांच्या रांगा तालुक्यात आठ दिवसांपासून डिझेल टंचाईने मशागतीची कामे खोळंबली आहेत. शहरापासून १० किमीपर्यंत चारही रस्त्यांवर २० पेक्षा अधिक पेट्रोल पंप आहेत. प्रत्येक पंपावर ‘नो स्टॉक’च्या पाट्या आहेत. चार दिवसांनी एक टँकर मिळत आहे. स्थानिकांसोबतच नेवासा, वैजापूर, पैठण, कन्नड तालुक्यातील वाहनधारक रांगा लावत आहेत. पैठण येथील ३६ पंपांवर डिझेलची टंचाई कायम पैठण तालुक्यातील ३६ पंपांवर इंधन टंचाईचे संकट कायम आहे. रात्री ११ नंतरही पिंपळवाडी आणि पैठण शहरात वाहनांच्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागात डिझेल मिळत नसल्याने शेतकरी कॅन घेऊन पंपावर नंबर लावत आहेत. अनेकदा स्टॉक संपत असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. अनेकदा नंबरवरून वाद होत आहेत. घाबरून जाऊ नये ^डिझेल संपणार या भीतीने शेतकरी अनावश्यक साठा करत आहेत. यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता गरजेपुरतेच इंधन घ्यावे. अनावश्यक साठा करून ठेवू नये. – सारिका भगत, तहसीलदार, कन्नड कन्नडला ३५ पैकी केवळ ८ पंपांवर डिझेल तालुक्यात ३५ पैकी ८ पंपांवर डिझेल उपलब्ध आहे. त्या ठिकाणी रांगा लागत असल्याने मशागत खोळंबली आहे. परिसरातून मुंबई-सुरतला जाणाऱ्या भाजीपाल्याचे भाडे वाढले आहे. एका क्रेटमागे २० रुपयांची वाढ झाल्याने कांदा आणि टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पूर्ण दिवस रांगेत जात आहे. वैजापूरला ३५ पंपांवर दिवसा अन् रात्रीही रांगा तालुक्यातील ३५ हून अधिक पंपांवर अनेक दिवसांपासून डिझेलसाठी दिवस-रात्र वाहनांच्या रांगा लागत आहेत. शेतकऱ्यांना नांगरणी, वखरणी व रोटाव्हेटरसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता आहे. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे अनेक पंपांवरील साठा संपल्याचे सांगितले जात आहे.
Source link
डिझेलअभावी ट्रॅक्टरची चाके थांबली:३५० पंपांवर ‘नो स्टॉक''चे फलक, कॅन घेऊन शेतकऱ्यांचा पंपावर मुक्काम