राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. त्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष तसेच इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
.
सचिन सावंत म्हणाले, मोदी सरकारचे विधेयक मागच्या अधिवेशनात पडले, त्यांचा पराभव झाला, त्यावेळी इंडिया आघाडीमधील घटक पक्ष एकत्र होते. त्यानंतर पक्ष फोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ते मोदी सरकारचे षड्यंत्र होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस त्याला बळी पडली. त्याची चिंता वाटते. इंडिया आघाडीत आज राहुल गांधी यांनी त्या संदर्भात ट्विट केले. भूमिका मांडली. छोट्या पक्षांवर दबाव येत आहे असे म्हटले.
पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, या भूमिकेमुळे हुकुमशाही मानसिकतेच्या मोदी सरकारला मदत होत आहे. हा निर्णय झाला असेल तर दुर्दैवी आहे. आधी आम्हाला शंका होती. आम्हाला वाटत होते, पवार साहेब इतकी वर्ष धर्मनिरपेक्ष विचारांचे राजकारण करत आहेत. निर्णय घेण्याआधी शंभरवेळा विचार करतील. पण असे झाले नाही, याचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पवार साहेबांशी माझी या विषयावर यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा डिलिमिटेशनचा विषयही नव्हता. पण तेव्हा साहेबांनी मला सांगितले होते की, डिलिमिटेशन हे कॉन्स्टिट्यूशनल असून ते करावे लागते. त्याला काही पर्याय नसतो. आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असे चालायचे. ही सगळी आमची अनौपचारिक चर्चा होती. पुढे आव्हाड म्हणाले की, मी ओपनली सांगतो, साहेब हे माझे दैवत आहेत. माझ्या दैवताची भूमिका जी, तिच माझी भूमिका आहे. त्यामुळे भूमिकेच्या बाबतीत कोणाचाच काही प्रश्न येत नाही. 8 खासदारांना घेऊन सुप्रिया ताईंनी निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.
या संदर्भातील ही बातमी वाचा..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा डिलिमिटेशनला पाठिंबा:जितेंद्र आव्हाडांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले- माझ्या दैवताची जी भूमिका तीच माझी

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्पष्ट होऊ लागली आहे. या विधेयकामुळे 50 टक्के जागा वाढणार असतील तर आपला पाठिंबा असेल आणि यावर ‘इंडिया’ आघाडीशी चर्चा करू, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावर आपली भूमिका मांडली असून, अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच डिलिमिटेशन अनिवार्य असल्याचे म्हटले असल्याने पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा राहील, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. वाचा सविस्तर