Headlines

पुण्यात बिसलेरीच्या बाटलीसारखे ड्रग्ज मिळतात: डिलिमिटेशनचे ‘गाजर’ दाखवून स्वतःचा खड्डा खणू नका, सतेज पाटील यांचा हल्लाबोल



पुण्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा सुळसुळाट आणि आगामी संसद विशेष अधिवेशनातील डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर 2026) पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना राज्य आणि केंद्र सरकारवर चौफेर टीकास

.

“पुण्यात आज कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, जशी बिसलेरीची पाण्याची बाटली सहज मिळते तसे पुण्यात ड्रग्ज मिळत आहेत. एकीकडे पुण्यात माणसे मारली जात आहेत आणि सरकार मात्र अतिक्रमणाच्या चर्चा करत बसले आहे,” असा सणसणीत टोला पाटील यांनी लगावला. तसेच, डिलिमिटेशन विधेयक हे लहान पक्षांसाठी स्वतःचाच खड्डा खणून घेण्यासारखे ‘गाजर’ असून, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) हे ‘इंडिया’ (INDIA) आघाडीसोबतच राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच रोहित पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला.

कायदा-सुव्यवस्था कोलमडली, तरी लक्ष कोणाचे?

पुण्यातील गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सतेज पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा केवळ पुण्यातच राहण्यावर भर दिसून येतो. पुणे ग्रामीणचे अधिकारी पुणे शहरात येतात, तर शहरातील अधिकारी ग्रामीण भागात किंवा एटीएसमध्ये (ATS) जातात; पण कोणीही पुण्याबाहेर जात नाही. अधिकाऱ्यांच्या या सोयीच्या बदल्या ही गृहमंत्र्यांची ‘ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बचत’ आहे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची, असा सवाल पाटील यांनी केला.

अतिक्रमणापेक्षा नागरिकांच्या जीवाला प्राधान्य द्या

अधिकारी कोठे राहतात यापेक्षा ते ड्युटी कशी करतात आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था (लॉ अँड ऑर्डर) कशी आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आज पुण्याची कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून रस्त्यावर लोक मरत आहेत; मात्र प्रशासन अतिक्रमणाच्या विषयावर चर्चा करण्यात मग्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

2023 मध्ये महिला आरक्षणाला पाठिंबा दिला

30 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनातील डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसची भूमिका सतेज पाटील यांनी स्पष्ट केली. 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले, तेव्हा काँग्रेसने त्याला एकमुखी पाठिंबा दिला होता आणि ते तात्काळ लागू करण्याची मागणी केली होती. मात्र, या सरकारची प्राथमिकता महिला आरक्षण लागू करणे ही नसून मतदारसंघ वाढवणे (डिलिमिटेशन) ही आहे. एकदा डिलिमिटेशनचा कायदा झाला की त्याची नियमावली केंद्र सरकार बनवणार आहे आणि त्यातून पुढे काय घडेल याची कोणालाही शाश्वती नाही. त्यामुळे हे डिलिमिटेशनचे ‘गाजर’ स्वीकारणे म्हणजे देशातील लहान पक्षांनी स्वतःचाच खड्डा खणून घेण्यासारखे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीसोबतच राहील

गेल्या 3 दिवसांपासून सुप्रिया सुळे यांच्या विधानांवरून चर्चा सुरू असल्या तरी, जोपर्यंत त्यांची अधिकृत भूमिका समोर येत नाही तोपर्यंत ‘जर-तर’च्या चर्चांवर बोलणे योग्य ठरणार नाही. यापूर्वीच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांमध्ये राष्ट्रवादीने या मुद्द्यावर आघाडीसोबतच राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या दिल्ली पातळीवर घटक पक्षांमध्ये बोलणी सुरू असून, 30 नोव्हेंबरच्या अधिवेशनात सर्व चित्र स्पष्ट होईल.

शरद पवारांच्या तब्येतीचे राजकीय विश्लेषण नको

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या स्टेटसचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. शरद पवार यांनी नुकताच दुष्काळी दौरा केला आणि वय व प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे; मात्र ते जनतेत राहणारे नेते असल्याने ऐकत नाहीत, या भावनेतून सुप्रिया ताईंनी ते स्टेटस ठेवले होते. त्यांच्या तब्येतीचे राजकीय विश्लेषण करणे संयुक्तिक ठरणार नाही.

रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निव्वळ अफवा

आमदार रोहित पवार हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. ना काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहित पवार यांना असा कोणताही प्रस्ताव देण्यात आला आहे, ना त्यांच्याकडून काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव आलेला आहे, असे सतेज पाटील यांनी अगदी ठामपणे स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *