![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मूर्तिजापुरात हर्षोल्लासात व जल्लोषात विविध सामाजिक उपक्रम आणि बाइक रॅली काढून साजरी करण्यात आली. शहरातील पूर्णाकृती पुतळा परिसर आणि विविध भागांत सकाळपासूनच नागरिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. निळ्या झेंड्यांनी व आकर्षक सजावटीने संपूर्ण परिसर निळा झाला होता. अनेक ठिकाणी सांस्कृतिक व समाज जागृतीपर उपक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रात्रीपासूनच उत्साहाचे वातावरण होेते. मंगळवारी सकाळपासून अभिवादनासाठी जनसागर उसळला. तालुक्यातील अनुयायी, समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेबांना वंदन करत अभिवादन केले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधवांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. दोन दिवसांपासून जयंती उत्सवाचे चैतन्य व उल्हास अखंडपणे वाहत होता. पूर्णाकृती पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती व वंचित घाडीच्या वतीने सकाळी ९ वाजेपासून रक्तदान शिबिर घेण्यात आले. शहरातील विविध भागातून युवकांनी बाइक रॅली काढून जय भीमच्या जयघोष केला. उन्हाचा तडाखा असताना अनुयायांचा उत्साह कुठेच कमी नव्हता. संघटनांच्या वतीने शहरातील धामणगाव फैल, चिखली गेट, राजगृहनगर, त्रिमूर्ती नगर, शिवाजीनगर, पंचशील वाडी, सत्संग भवन परिसर, प्रतिक नगर भागातून काढलेल्या मिरवणुका रात्रीपर्यंत पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचत होत्या. पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने तेथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. विविध संस्था, संघटनांच्या वतीने बाबासाहेबांना वंदन करण्यात आले. या वेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. रॅलीत निळे फेटे अन् झेंड्यांनी वेधले लक्ष जयंतीनिमित्त काढलेल्या बाइक रॅलीमध्ये निळे फेटे आणि निळ्या रंगाचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. बाइक रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये सहभागी युवक तरुण-तरुणी तसेच समाजबांधवांच्या उत्साहाला उधाण आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. एलआयसी कार्यालयात जयंतीनिमित्त जल्लोष मूर्तिजापूर येथील एलआयसी कार्यालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे विकास अधिकारी नितीन कुंडले यांच्या हस्ते पूजन करून हारार्पण करण्यात आले. शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले. या वेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले.
Source link
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला मोठा जनसागर:बाइक रॅली; जयभीमच्या घोषणांचा निनाद, रक्तदान शिबिर