![]()
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गांधी भवन येथे झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते; डॉ. सप्तर्षी सुमारे २० वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. या बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. (MKCL) चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांचाही विश्वस्त मंडळात नव्याने समावेश करण्यात आला. विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी ही माहिती दिली. सध्याच्या विश्वस्त मंडळात तुषार गांधी, लक्ष्मीकांत देशमुख, सिसिलिया कार्व्हालो, अॅड. अभय छाजेड, मच्छिंद्र गोर्डे, एम. एस. जाधव आणि रमेश आढाव यांचा समावेश आहे. सुनील पाटील हे निमंत्रित विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधींच्या १९४८ मधील हत्येनंतर त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात गांधी स्मारक निधी अंतर्गत गांधीभवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रात १९५० नंतर या कार्याला सुरुवात झाली आणि १९६१ मध्ये पुण्यातील कोथरूड येथे गांधी भवन साकारले गेले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. गेल्या ७५-७६ वर्षांत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मामासाहेब देवगिरीकर, बाळासाहेब भारदे आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. डॉ. शिवाजीराव कदम हे भारती विद्यापीठाचे कुलपती असून, ते दीर्घकाळापासून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू कै. डॉ. पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच डॉ. शिवाजीराव कदम यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गांधी भवन येथे आयोजित गांधी दर्शन शिबिरे आणि पुण्यातील पहिल्या गांधी विचार साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा विशेष सहभाग होता. नवीन विश्वस्त विवेक सावंत हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. (MKCL) चे माजी व्यवस्थापकीय संचालक असून, सध्या ते मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेला ‘एम.एस.सी.आय.टी.’ (MS-CIT) हा संगणक प्रशिक्षण कोर्स ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ठरला आहे.
Source link
डॉ. शिवाजीराव कदम महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष:डॉ. कुमार सप्तर्षींच्या निधनानंतर एकमताने निवड