Headlines

तंत्रज्ञानाच्या मदतीने कठपुतळी कलेत नवे प्रयोग:पपेट फेस्टिवलमधील कार्यशाळेत अनुरूपा रॉय यांची माहिती; 800 वर्षे जुन्या कठपुतळ्यांचे डिजिटल स्कॅनिंग




सुमारे ८०० वर्षे जुन्या कठपुतळ्यांचे डिजिटल स्कॅनिंग, सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वतः प्रकाश देणाऱ्या कठपुतळ्यांचा वापर करून कलाकार नवे प्रयोग करत आहेत. पारंपरिक कलेचा गाभा कायम ठेवून तंत्रज्ञानाची जोड दिल्याने सादरीकरणाचे नवे मार्ग खुले होत आहेत, असे कठपुतळी कलाकार, दिग्दर्शिका आणि संकल्पनाकार अनुरूपा रॉय यांनी सांगितले. पुण्यात सुरू असलेल्या पपेट फेस्टिवलमधील कठपुतळी निर्मिती कार्यशाळेत कलाकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. तो २२ नोव्हेंबरपर्यंत श्रीराम लागू रंग-अवकाश येथे सुरू राहणार आहे. पारंपरिक आणि समकालीन कठपुतळी कलेची ओळख करून देणाऱ्या महोत्सवात सादरीकरणे, कार्यशाळा आणि संवाद सत्रांचा समावेश आहे. डिजिटल साधने, नवे साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील तंत्रांचा वापर करून कलाकार प्रयोग करत आहेत. मात्र, पारंपरिक कलाप्रकारांशी असलेली नाळ कायम ठेवणेही महत्त्वाचे आहे, असे रॉय म्हणाल्या. कर्नाटकातील ज्येष्ठ कठपुतळी कलाकार गुंडुराजू यांच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव सांगताना रॉय यांनी त्यांच्या संग्रहातील सुमारे ८०० वर्षे जुन्या कठपुतळ्यांच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख केला. कठपुतळ्यांचे डिजिटल स्कॅनिंग करून त्यांची प्रतिमा प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान वेगवेगळ्या पृष्ठभागांवर दाखवण्यात आली. “आम्ही त्याच पारंपरिक कठपुतळ्यांचे स्कॅनिंग करून त्यांचा प्रयोगात वापर केला. ८०० वर्षे जुन्या कठपुतळ्या आणि आजच्या ॲनिमेशनची सांगड घालून, प्रत्यक्ष सादरीकरणादरम्यान त्यांचे प्रक्षेपण करणे हा रंजक अनुभव होता,” असे रॉय यांनी सांगितले. कठपुतळी नाट्याच्या अभिव्यक्तीच्या कक्षा तंत्रज्ञानामुळे विस्तारत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर्स आणि लहान कठपुतळ्यांचा वापर विशिष्ट जागांशी जोडलेल्या सादरीकरणांत वाढत आहे, असे त्यांनी नमूद केले. इलेक्ट्रॉनिक सर्किट्सच्या मदतीने स्वतः प्रकाश देणाऱ्या कठपुतळ्या, ओव्हरहेड प्रोजेक्टर्स आणि प्रकाशयोजनेतील नवे प्रयोग यांमुळे सादरीकरणात वेगवेगळे दृश्य परिणाम साधता येतात. कठपुतळी प्रयोगांमध्ये प्रकाशयोजनेचा वापर कॅमेऱ्याच्या नजरेप्रमाणे केला जातो, असेही त्यांनी सांगितले. कठपुतळ्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्येही बदल होत आहेत. विमाननिर्मिती उद्योगात वापरले जाणारे हलके साहित्य वापरून मोठ्या आकाराच्या कठपुतळ्या तयार केल्या जात असल्याचे रॉय यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *