Headlines

तटकरे – पवारांच्या भेटीवर राजकीय वावड्या:चर्चा रंगवण्यात अर्थ नाही -पाटील; भेटीचा राजकीय संदर्भ काढण्याची गरज नाही – बावनकुळे




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एनसीपीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची कथितपणे हकालपट्टी केल्यानंतर तटकरेंनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क रंगले आहे. पण तटकरेंनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. मंत्री अनिल पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. तरीही या भेटी भवतालच्या चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेले एक पत्र व्हायरल झाले असून, त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची नावे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून या दोन्ही नेत्यांना ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना स्वतः तटकरे यांनी या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्वतः सुनील तटकरे भेटीवर काय म्हणाले? सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार साहेब यांची भेट घेण्याची वेळ काल मिळाली होती. त्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. ते गेली 6 दशके देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात दिर्घकाळ काम केले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे सदिच्छा भेट घेणे ही संस्कृती आहे. तेवढेच कारण त्या भेटीमागे होते. त्यामागे इतर कोणतेही राजकीय कारण नाही. तटकरेंनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली – अनिल पाटील दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अन्य एक ज्येष्ठ नेते तथा मंत्री अनिल पाटील यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मला असे वाटते आता ज्या पद्धतीने चर्चा रंगल्या आहेत किंवा रंगवल्या जात आहेत त्याला काहीही अर्थ नाही. सुनील तटकरे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी मागील 8 दिवसांपासून प्रयत्नशील होते. काल सुनेत्रा वहिनी व ते गुवाहाटीला हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधीला जाऊन आले. येताना त्यांची चर्चा झाली. त्यानंतर ते शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची आत्ताच रुग्णालयातून सुट्टी झाली असेल, तर त्या नेत्याची विचारपूस करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची आहे. राजकीय वावड्या उठवणे चुकीचे – बावनकुळे भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी राजकीय वावड्या उठवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या व सुनील तटकरेंच्या भेटीविषयी राजकीय वावड्या उठवणे चुकीचे आहे. कारण, तटकरेंनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवारांसोबत त्यांच्या राजकीय व सामाजिक आणि सर्वच कौटुंबिक पातळीवर त्यांचा संबंध राहिला आहे. त्यामुळे आपल्या स्नेह्यांशी कधी भावनेतून, तर कधी सहजपणे चर्चा करावी वाटते. त्यातून ही भेट झाली असेल. मी स्वतः राज ठाकरेंकडे जाऊन आलो. त्यात काही राजकीय अर्थ नसतात. त्यामुळे त्याचा काही राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही. प्रफुल्ल पटेल नाराज दरम्यान, सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कथितपणे डच्चू दिल्यामुळे पटेल नाराज झाल्याची चर्चा समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल पटेल पक्षाच्या सध्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेत. त्यामुळे ते पुढे कोणता राजकीय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *