Headlines

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎




आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त झाली आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या शानदार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी भूषवले, तर स्वागताध्यक्ष म्हणून नगरसेवक सुरेश बनसोडे उपस्थित होते. व्यासपीठावर आ. संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संयोजन समिती सदस्य संजय खामकर, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, प्रा. गणी पटेल, बापूसाहेब भोसले, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे उपस्थित होते. कृषी मंत्री भरणे म्हणाले, मी मंत्री असलो तरी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट, अडीअडचणी मी जवळून अनुभवल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे मला मिळालेल्या या संधीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून या पदाचे सोने करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. या सोहळ्यात प्रा. डॉ. गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना प्रतिष्ठित ‘शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. उद्घाटनापूर्वी शाहीर भारत गाडेकर, शाहीर वसंत डंबाळे, शाहीर शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, हौशीनाथ बोर्डे, दिगंबर गोंधळी, दत्तू रसाळ आणि सहकाऱ्यांनी उद्घाटनापूर्वी शानदार शाहिरी जलसा कार्यक्रम सादर केला. महापौर ज्योती गाडे व स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनीही वाचन संस्कृती वाढवण्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक संस्थापक सुनील गोसावी यांनी, सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी, तर आभार कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. या भव्य सोहळ्यासाठी अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यिक आणि पत्रकारांनी ‘जागल्याची’ भूमिका वठवावी साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून साहित्यातून लोकभावनांचे प्रतिबिंब उमटत असते. आज देशात आणि राज्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता युवकांच्या व्यथा मांडण्यासाठी साहित्यिक, पत्रकार आणि कलावंतांनी आगामी काळात समाजाचे ‘जागले’ म्हणून सजग भूमिका पार पाडणे गरजेचे आहे, असे संमेलन अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *