Headlines

तळेगावमध्ये सिगारेटची प्रतिकात्मक अंत्ययात्रा:जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त जनजागृती मोहीम




जागतिक तंबाखूमुक्त दिनाचे औचित्य साधून, तळेगाव येथील ‘टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर’ने एक अनोखा जनजागृती उपक्रम राबवला. ‘सिगारेटची अंत्ययात्रा’ या नावाने आयोजित या मोहिमेतून धूम्रपान आणि तंबाखूच्या जीवघेण्या दुष्परिणामांकडे समाजाचे, विशेषतः तरुण पिढीचे लक्ष वेधण्यात आले. “आज सिगारेटची अंत्ययात्रा… उद्या तुमची होऊ देऊ नका” असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला. या उपक्रमात रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात “आरआयपी स्मोकिंग” आणि “टोबॅको-फ्री इंडिया” असे संदेश असलेले फलक धरून प्रतीकात्मक सिगारेटची अंत्ययात्रा काढली. “व्यसनाऐवजी निरोगी आयुष्याची निवड करा” अशा घोषणा देत नागरिकांनी निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला. या रॅलीदरम्यान सादर करण्यात आलेल्या एका भावनिक नाटिकेने धूम्रपानामुळे फुफ्फुसे, घसा आणि हृदयावर होणारे गंभीर परिणाम तसेच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका प्रभावीपणे मांडला. तज्ज्ञांच्या मते, तंबाखूचे सेवन हे तोंडाचा, घशाचा व फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग आणि स्ट्रोकचे प्रमुख कारण आहे. सततचा खोकला, तोंडात न भरणारे व्रण, हिरड्यांतून रक्त येणे, गिळताना त्रास होणे आणि अचानक वजन कमी होणे ही तंबाखू सेवनाची प्राथमिक लक्षणे आहेत. दुर्दैवाने या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर रूप धारण करतो. तसेच, धूम्रपानामुळे केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच नाही, तर ‘सेकंड-हॅन्ड स्मोक’मुळे त्यांच्या निष्पाप कुटुंबीयांनाही आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो. या मोहिमेबद्दल बोलताना टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख म्हणाले, “अनेक तरुण सहज म्हणून धूम्रपान सुरू करतात, पण त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त करतात. म्हणूनच तरुणांमध्ये भावनिक पातळीवर जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा प्रतीकात्मक अंत्ययात्रेचा मार्ग निवडला, जेणेकरून लोक वेळीच सावध होतील.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *