![]()
हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल तीन जलकुंभाची उभारणी झाली तसेच 99 लाख रुपयांचा खर्च झाल्यानंतरही गाव तहानलेलेच असून या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी मंगळवारी ता. 21 केली आहे. पिंपळखुटा गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर झाले होते. याकामांवर आतापर्यंत 99 लाख रुपयांचा खर्चही झाला आहे. या योजनेमध्ये एक जलकुंभ उभारण्यात आला तर यापुर्वीच्या योजनेतील दोन जलकुंभ असून गावात 3 जलकुंभ झाले आहेत. मात्र एकाही जलकुंभापर्यंत पाणी पोहोचलेच नसल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जात आहे. सध्या गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून काही गावकऱ्यांना खाजगी नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, या कामांवर झालेला 99 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून या कामाची चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात गावकरी रवी गायकवाड, संतोष पाखरे, मनोज खंदारे, विशाल खंडागळे, सतिश कांबळे, सुनील गायकवाड, पवन जाधव, सुरेश जाधव, ज्योतीबा गायकवाड, धम्मपाल कांबळे, धम्मानंद कांबळे, राहुल कांबळे, अमोल गायकवाड, विठ्ठल गायकवाड, पुंजाजी खंदारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Source link
तीन जलकुंभाची उभारणी, 99 लाखांचा खर्च तरीही गाव तहानलेलेच:पिंपळखुटा गावातील प्रकार; नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी