![]()
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सोमवारी (२५ मे) दंगल नियंत्रण व जमाव नियंत्रणाबाबत सुरू असलेल्या सरावावेळी प्लास्टिक स्मोक स्टन ग्रेनेड हातातच फुटल्याने चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांना गंभीर इजा झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची पोलिस उपअधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या पथकाच्या जवानांचा सराव सुरू होता. या वेळी ही घटना घडली. पोलिस अंमलदार शुभम पांडुरंग कावरे, योगेश गणेश साळुंके, शिवराज संजय पवार व गणेश मधे हे जखमी झाले. यातील कावरे यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच, पवार यांच्या हाताला इजा झाली आहे. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची चौकशी केली. या घटनेची चौकशी केली जाईल, ग्रेनेड वापरायोग्य होते की मुदत संपलेले हे चौकशीत स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लिव्हर पट्टी चुकून खाली पडल्याने स्फोट झाला : संयुक्त सराव सुरू असताना संबंधित जवानांनी ग्रेनेडची पिन काढल्यानंतर लिव्हर पट्टी चुकून खाली पडली. त्यामुळे ग्रेनेडचा हातातच स्फोट झाला. हे ग्रेनेड सन २०२३ चे असून ते वापरायोग्य होते. तयार केल्यानंतर सात वर्षे ते वापरता येतात, असे राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी म्हणाले. लिव्हर पट्टी सुटल्यानंतर १.५ ते २ सेकंदात स्फोट स्टन ग्रेनेड आणि स्मोक ग्रेनेड हे मुळात दोन वेगळे प्रकार आहेत. ग्रेनेडच्या सुरक्षेसाठी त्यात एक ‘सेफ्टी पिन’ आणि ‘लिव्हर पट्टी’असते. जेव्हा सेफ्टी पिन खेचून काढतात, तेव्हा लिव्हर पट्टी हाताने घट्ट दाबून धरलेली असते. हातातून लिव्हर पट्टी चुकून सुटली किंवा पडली, तर आतील स्प्रिंग-लोडेड स्ट्रायकर वेगाने आतल्या प्रायमरला धडकतो, ज्यामुळे ठिणगी पडून आतील ‘फ्यूज’ पेट घेतो. एकदा लिव्हर पट्टी उडाली की आतील प्रक्रिया थांबवणे अशक्य असते.
Source link
दंगल नियंत्रण सरावात हातात ग्रेनेड फुटून 4 पोलिस जखमी:अहिल्यानगरला बकरी ईदनिमित्त सुरू होता सराव