Headlines

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कीर्तन महोत्सव:चातुर्मासानिमित्त 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पुणे येथे आयोजन




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुणे येथे १ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणार असून, यात महाराष्ट्रातील विविध भागांतील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. हा कीर्तन महोत्सव आपटे रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सर्व पुणेकरांसाठी हा महोत्सव विनामूल्य खुला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. चातुर्मासानिमित्त शनिवार, १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात नाशिक येथील वारकरी भूषण ह.भ.प. चैतन्य महाराज निंबोळे, आळंदी येथील ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प. ओंकार महाराज दुडे शास्त्री, आळंदी साधकाश्रम येथील ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळेल. याशिवाय, डोंबिवली येथील श्रीमलंग गड येथील ऑनलाइन कीर्तन गुरुकुलाचे संस्थापक ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, परभणी मानवत येथील वारकरीभूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे आणि पंढरपूर येथील मानकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचेही कीर्तन होणार आहे. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी जगद्गुरु फाउंडेशनचे संस्थापक ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. महोत्सवाचा समारोप रविवार, ९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाने होईल. भारुड कलेसाठी डॉ. देखणे यांना केंद्र सरकारचा उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कार २०२४ मिळाला आहे. या महोत्सवाचा लाभ घेऊन पुणेकरांनी स्वरब्रह्माची अनुभूती घ्यावी, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *