![]()
आजच्या काळात मानवी जीवन पूर्णतः तंत्रज्ञानाने व्यापले आहे. मोबाईलसारखे तंत्रज्ञान व्यक्तीसोबत नेहमीच असते, ज्यामुळे तिची सर्व माहिती तंत्रज्ञानाकडे जमा होते. गुन्हेगारीचे स्वरूप बदलल्याने तपास यंत्रणा आणि पद्धतींमध्येही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा तंत्रज्ञानासंदर्भात माहिती आणि शिक्षण ही काळाची गरज बनली आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले. ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तंत्रज्ञान विभाग, पुनीत बालन ग्रुप आणि न्यूलिफ लाईफ स्पेसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास’ सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जिऑलॉजी विभागामध्ये झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जीएसटी विभागाच्या अपर महासंचालक वृंदाबा गोहिल, पुणे एटीएसचे एसपी संभाजी कदम, डॉ. आरती दातार, माधुरी सातपुते, लीना सातपुते, प्राजक्ता गिरी आणि ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीसचे प्रमुख केतन अत्रे उपस्थित होते. डॉ. काळकर यांनी सांगितले की, व्यक्तीच्या बँकेतील व्यवहारांपासून ते पर्यटन आणि दैनंदिन जीवनाची सर्व माहिती मोबाईलमध्ये दररोज नोंदवली जाते. मात्र, अनेक जण याबद्दल अनभिज्ञ असतात. मोबाईल ही आज प्रत्येकाची गरज बनली असली तरी, त्याबद्दल प्रत्येकाला संपूर्ण माहिती नसते. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेतात आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी त्यांची संपूर्ण माहिती असणे ही पहिली पायरी आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या सायबर सुरक्षा तंत्रज्ञानासंदर्भात जनजागृती करणाऱ्या कार्यशाळांची नितांत गरज आहे. मोबाईलसारखे तंत्रज्ञान प्रत्येक वयोगटातील व्यक्ती सोबत घेऊन फिरते. मोबाईल गरज असला तरी त्याचे दुष्परिणाम काय आहेत, हे अनेकांना माहीत नाही. त्याचे दुष्परिणामही प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. मोबाईल तंत्रज्ञान कशाप्रकारे हाताळावे, याची माहिती सर्वसामान्यांना झाल्यास मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेही डॉ. काळकर यांनी नमूद केले. जीएसटी विभागाच्या अपर महासंचालक वृंदाबा गोहिल म्हणाल्या की, सायबर गुन्हेगारीविरोधात तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पुणे विद्यापीठ आणि ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीस यांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अशा अनेक उपक्रमांची गरज असून, सायबर सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास सायबर गुन्हेगारीवर निश्चितच आळा घालता येईल. कुंदन कुमार सराफ यांनी सांगितले की, आपल्या मोबाईलमध्ये कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, याबाबत प्रत्येकाने सतर्कता बाळगली पाहिजे.
Source link
सायबर सुरक्षा शिक्षण काळाची गरज: डॉ. काळकर:पुणे विद्यापीठात 'इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास' कार्यशाळेचे आयोजन