![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या १३४ व्या गणेशोत्सवासाठी वृंदावनमधील प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांवरील दिव्य प्रेम आणि भक्तीचे प्रतीक असलेले हे मंदिर भाविकांना आध्यात्मिक अनुभव देईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात या सजावटीचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. कलादिग्दर्शक नितेश कुमार यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी सांगितले की, ट्रस्ट गेली अनेक वर्षे विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती साकारत आहे. यंदा साकारण्यात येणारे प्रेम मंदिर त्याच्या मनमोहक पांढऱ्या संगमरवरी वास्तुकलेसाठी आणि उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांचे दर्शन हे या मंदिराचे विशेष आकर्षण आहे. ही प्रतिकृती १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असेल. प्रतिकृतीच्या रचनेत संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग असेल. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारे कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट असतील. रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपटही यात समाविष्ट असतील. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघेल. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रेम, भक्ती, सलोखा आणि श्रद्धा या मानवतेला एकत्र बांधणाऱ्या शक्तींचा मिलाफ या प्रतिकृतीद्वारे मांडण्याचा प्रयत्न आहे. बुधवार चौकात भव्य कमान साकारण्यात येणार असून, मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारले जातील. मंदिराच्या वरच्या दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील असेल. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.
Source link
दगडूशेठ गणपती यंदा वृंदावनमधील प्रेम मंदिरात विराजमान:गणेशोत्सवासाठी ट्रस्टकडून भव्य प्रतिकृतीची निर्मिती