Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांकडून आंतरजिल्हा दरोडेखोर टोळी जेरबंद:एका रात्रीत पाच दरोडे, 20 गुन्हे उघड; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त




पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंड, बारामती, जुन्नर आणि आसपासच्या परिसरात दरोडे, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत टोळीतील तिघांना अटक केली असून, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिली. १० जून २०२६ रोजी मध्यरात्री दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती आणि खोरवडी परिसरासह श्रीगोंदा येथे सहा ते सात दरोडेखोरांनी नागरिकांना मारहाण करून शस्त्रांचा धाक दाखवला होता. त्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी लुटल्या होत्या. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी सहा विशेष तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुन्हे करण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, १३ जून रोजी केलेल्या कारवाईत गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), विशाल हंबरड्या काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाबुळगाव खालसा, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. याच कारवाईत एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीतील प्रविण उर्फ पप्पू लाला भोसले आणि इतर साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर चोरीचा ऐवज असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात या टोळीने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोड्याचे चार, जबरी चोरीचे सहा आणि घरफोडीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोड्याचे तीन, जबरी चोरीचे तीन आणि घरफोडीचे दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, टोळीतील सदस्य गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या घरी न जाता वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले जात होते. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी ते शेतात, माळरानावर किंवा विटभट्ट्यांवर वेषांतर करून मुक्काम करत होते. कायमस्वरूपी एका ठिकाणी न थांबण्याची ही पद्धत अवलंबल्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *