![]()
सणासुदीच्या दिवसांत उपवासाच्या पदार्थांमध्ये भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील प्रसिद्ध दाळमंडईत धडक कारवाई करत १ लाख ९ हजार ५२० रुपयांची ५३६ किलो संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाची भगर जप्त केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. याच मोहिमेअंतर्गत सहआयुक्त मंगेश माने यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त गौरव जगताप यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी एस. ए. मुल्ला व किरण जगदाळे यांच्या पथकाने दाळमंडईतील मे. मनोजकुमार मदनलाल शेठिया या दुकानावर मंगळवारी रात्री छापा टाकला. तपासणीदरम्यान या दुकानात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे उघड उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. नियमावली धाब्यावर बसवून निकृष्ट व संशयित भगर साठवून ठेवल्याचे समोर आल्यानंतर पथकाने कलम ३८ अन्वये तात्काळ कारवाई करत खालील साठा जप्त केला.भगरीचे ९५६ पाकिटे (४७८ किलो) किंमत रु. ९५,६००,११६ पाकिटे (५८ किलो) किंमत रु. १३,९२०, एकूण साठा ५३६ किलो (एकूण किंमत १,०९,५२० रुपये) असा साठा जप्त केला. नमुने लॅबकडे रवाना, अहवालानंतर पुढील कारवाई अधिकाऱ्यांनी जप्त केलेला सर्व माल पंचांसमक्ष जागेवरच सीलबंद केला असून, पुढील आदेश येईपर्यंत संबंधित मालाच्या विक्री व वितरणावर सक्त मनाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या भगरीचे नमुने पुढील रासायनिक व दर्जात्मक विश्लेषणासाठी शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
Source link
दाळमंडईमध्ये अन्न व औषधचा छापा:भेसळयुक्त भगर जप्त, अन्न औषध प्रशासन विभागातर्फे राज्यभरात तपासणी मोहीम