Headlines

गॅलरीतून पोलिसांना आत्महत्येची धमकी:गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीच्या चेअरमनचा नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा‎




बचत खात्यावर आणि मुदत ठेवींवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या श्री संत माऊली क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाठ (२६, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याला अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेच्या वेळी शिरसाठ याने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत जाऊन आत्महत्येची धमकी दिली. अहिल्यानगर-नाशिक पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. श्री संत माऊली क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुनील शिरसाठ आणि संचालक मंडळाने नागरिकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले होते. जाहिराती तसेच प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून बचत खाते उघडल्यास आणि मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवल्यास जादा व्याज मिळेल, असे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवून अनेक नागरिकांनी सोसायटीमध्ये पैसे जमा केले. मात्र, गुंतवणूकदारांनी खात्यांवरील रक्कम परत मागितल्यानंतर त्यांना वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, गोल्ड लोनअंतर्गत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने परत न देऊनही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. एआय इमेज अग्निशमन दलाच्या मदतीने घेतले ताब्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शिरसाठचा शोध घेत असताना तो नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला. आयुक्त कर्णिक यांनी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक पोलिसांनी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये जाऊन अग्निशमन दलाच्या मदतीने शिरसाठला ताब्यात घेण्याची कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *