![]()
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक प्रश्नांवरून आंदोलन तीव्र झाले आहे. पाचव्या वेतन आयोगाचा थकीत फरक, सहाव्या वेतन आयोगाचे आठ हप्ते आणि वेळेवर पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संलग्न पेन्शनर असोसिएशनच्यावतीने महापालिका प्रवेशद्वारात धरणे आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी हलगी वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष एन. एम. पवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. न्यायालयीन निर्णयानुसार ५०६ निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाचा थकीत फरक मिळणे बाकी आहे. तसेच सहाव्या वेतन आयोगाचे सुमारे ६० ते ६५ लाख रुपयांचे प्रलंबित आठ हप्ते दिवाळीपूर्वी अदा करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. औषधोपचार आणि सणासुदीच्या खर्चासाठी पैशांची अडचण निर्माण झाल्याने दरमहा ५ तारखेपर्यंत पेन्शन खात्यात जमा करण्याची मागणीही करण्यात आली. पहिल्या दिवशी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर व बाळासाहेब पवार यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. आमदार जगताप यांनी हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत.
Source link
मनपा प्रवेशद्वारात पेन्शनर्सकडून हलगीचा कडकडाट:दिवाळी तोंडावरच्या थकीतवेतनासाठी आक्रोश