![]()
पिंपळकोठे येथे भरदिवसा एका शेतातील घरात घुसून दोन अज्ञात दरोडेखोरांनी वृद्ध महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला करत सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. या धाडसी दरोड्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी सुभाष भामरे यांच्या शेतातील घरात मंगळवारी (दि.१३) दुपारी त्यांची पत्नी सुनंदाबाई (६०) एकट्याच होत्या, तर इतर कुटुंबीय काही अंतरावर कांदा लागवडीत व्यस्त होते. याचा गैरफायदा घेत आधीच पाळत ठेवलेल्या काळ्या कपड्यातील दोन संशयितांनी घरात घुसून कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. सुनंदाबाईंनी प्रतिकार करताच चोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. अखेर जिवाच्या भीतीने त्यांनी अंगावरील दागिने व कपाटातील कांदा विक्रीचे ५० हजार रुपये चोरांच्या स्वाधीन केले. फिर्यादीवरून जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपअधीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक टीमनेही ठसे व पुरावे गोळा केले आहेत. काही दिवसांपूर्वी तुंगण भागातही चोरी झाली होती; त्यामुळे शेतवस्त्यांवरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
Source link
पिंपळकोठेत भरदिवसा घरात घुसून वृद्धेवर चाकूने हल्ला:साेन्याचे दागिने व 50 हजारांची रोख रक्कम लुटली