Headlines

आखतवाडे रेशन दुकानाचा परवाना रद्द; अनामत रक्कमही जप्त होणार:प्रशासनाच्या पत्रानंतर ग्रामस्थांचे 13 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे‎




बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील रास्तभाव दुकान क्र. १९ चा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून, दुकानदाराची संपूर्ण अनामत रक्कम शासनाकडे जप्त करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिले आहेत. रेशन धान्य वितरणातील कथित गैरव्यवहाराविरोधात ग्रामस्थांनी २ ऑक्टोबरपासून सुरू केलेले साखळी उपोषण १३ दिवसांनंतर मागे घेतले. आखतवाडे येथील रास्तभाव दुकानातून मागील काही काळापासून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. ऑगस्ट २०२४ मध्ये शिधापत्रिकाधारकांचे मशीनवर अंगठ्याचे ठसे घेण्यात आले; मात्र प्रत्यक्षात धान्य न देता धान्यसाठ्यात फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मशीनमधून पावती न देणे, दुकानात दक्षता समितीचा फलक न लावणे, तसेच शासनाकडून मागील सहा महिन्यांपासून येणाऱ्या पिशव्या व साड्यांचे वाटप रोखून धरणे, असे प्रकारही घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. युनिटप्रमाणे केवळ ५० टक्के धान्य वाटप केले जात असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला होता. न्याय मिळावा, यासाठी आखतवाडे येथील १०० ते १५० शिधापत्रिकाधारक व ग्रामस्थांनी २ ऑक्टोबर २०२६ (महात्मा गांधी जयंती) पासून ग्राम महसूल अधिकारी कार्यालयासमोर आमरण व साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विशेष तपासणी समिती नेमली. समितीने ८ ऑक्टोबर रोजी गावात प्रत्यक्ष जाऊन ३५६ ग्रामस्थांचे जबाब नोंदवले. चौकशीअंती १३ ऑक्टोबर रोजी रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. बुधवारी (दि.१४) सटाणा येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी गोविंद आमले आणि तलाठी कविता पठारे यांनी उपोषणस्थळी जाऊन तहसीलदार बागलाण यांचे अधिकृत कारवाईचे पत्र ग्रामस्थांना दाखवले. यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. वरिष्ठ स्तरावरील आदेशानुसार नियमानुसार कारवाई करण्यात आली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असल्याचे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले. दरम्यान, दै. ‘दिव्य मराठी’ने बातमीच्या माध्यमातून हा प्रश्न लावून धरल्याने प्रशासनाला कारवाई करावी लागल्याचे सांगत आखतवाडे ग्रामस्थांनी वृत्तपत्राचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *