Headlines

कागजीपुरा तलावातून पाणी घेण्यास परवानगी द्या:वीटभट्टीधारकांची मागणी, चार महिन्यांसाठी पाणी देण्याची निवेदनाद्वारे विनंती‎




तालुक्यातील ऐतिहासिक कागजीपुरा येथील तलावातून वीटभट्ट्यांसाठी पाणी घेण्यास प्रशासनाकडून तातडीने बंदी घालण्यात आल्याने स्थानिक वीटभट्टीधारक आणि मजूर मोठ्या संकटात सापडले आहेत. गावातील सुमारे ९० टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने तलावातून पाणी घेण्यास पूर्ववत परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी वीटभट्टीधारकांनी खुलताबादच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कागजीपुरा येथील तलावातील पाण्याचा वापर वीटभट्ट्यांसाठी करण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आल्याने वीटभट्टीधारकांसमोर रोजगाराची गंभीर अडचण निर्माण झाली आहे. तलाठी सज्जा खिर्डी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी वीटभट्टीधारकांना तलावातून पाणी घेण्यास स्पष्ट मनाई केली, तसेच वीटभट्ट्यांचे कामकाज बंद ठेवण्याबाबत कडक सूचना दिल्या. प्रशासनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण व्यवसायाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालू हंगामासाठी वीटभट्टीधारकांनी आधीच मोठी गुंतवणूक केली आहे. विटा बनवण्यासाठी लागणारी माती, कोळसा यांसारखा कच्चा माल खरेदी करण्यात आला असून, कामावरील मजुरांना व वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणावर आगाऊ (ॲडव्हान्स) रक्कम देण्यात आली आहे. जर यंदाच्या वर्षी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू झाला नाही, तर दिलेली आगाऊ रक्कम परत मिळणे अशक्य होईल. परिणामी वीटभट्टीधारक कर्जाच्या आणि मोठ्या आर्थिक नुकसानीच्या गर्तेत अडकतील. प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ पाण्याचा वापर म्हणून न पाहता, ग्रामीण भागातील उपजीविका आणि रोजगाराशी निगडित संवेदनशील विषय म्हणून पाहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तहसीलदारांना देण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निवेदनावर गावातील माजी सरपंचांसह सर्व प्रमुख वीटभट्टी व्यावसायिकांच्या सह्या आहेत. आता खुलताबाद तहसील प्रशासन यावर काय सकारात्मक निर्णय घेते, याकडे संपूर्ण कागजीपुरा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ९० टक्के कुटुंबे वीटभट्टी व्यवसायावर अवलंबून व्यवसाय ठप्प होण्याची भीती कागजीपुरा गावातील बहुतांश म्हणजेच सुमारे ९० टक्के कुटुंबे थेट वीटभट्टी व्यवसायावर अवलंबून आहेत. या कुटुंबांकडे उदरनिर्वाहाचा किंवा रोजगाराचा अन्य कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. वीटभट्ट्यांसाठी पाणीच उपलब्ध झाले नाही, तर संपूर्ण कामकाज ठप्प होऊन हजारो मजूर व व्यावसायिकांच्या दैनंदिन उत्पन्नावर थेट गदा येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीबंदीचा निर्णय घेताना या गरीब कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि रोजगाराचा मानवी दृष्टिकोनातून विचार करावा, अशी आग्रही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *