Headlines

दाहकता:चिंचवण येथे पाणीटंचाई; टँकरचा प्रस्ताव रखडला, गावची पाणीपुरवठा विहिर पूर्ण आटली‎




चिंचवण (ता. सिल्लोड) येथे २० फेब्रुवारीपासून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे पाणी पूर्णतः आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासक यांनी परिसरातील खासगी विहिरींची पाहणी केली. मात्र कोणत्याही विहिरीतून दररोज दरडोई किमान २० लिटर पाणीपुरवठा होईल इतके पाणी उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ११ मार्च रोजी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. यानंतर २८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सहायक कनिष्ठ भूवैज्ञानिकांनी स्थळ पाहणी करून गावात कुठेही पुरेसा पाणीसाठा नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ‘प्रपत्र-ब’ भरून टँकर हा एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले. मात्र संबंधित प्रस्ताव तहसीलदारांच्या स्वाक्षरीअभावी अद्याप प्रलंबित असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गावातील महिला व नागरिक तहसीलदारांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना तहसीलदार भेटले नाहीत. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. सध्या महिलांना उन्हातानात शेतातून पाणी आणावे लागत असून लहान मुले, वृद्ध व गरोदर महिलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चिंचवण येथे मागील १५ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत गावात पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाले असले तरी वाढीव प्रस्तावामुळे ते रखडले असून पाणीटाकी व पाइपलाइन अपूर्ण अवस्थेत आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने तसेच उन्हाळ्यातील घरगुती कामांमुळे पाण्याची गरज अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर टँकरच्या मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास गावातील महिला, बालके व वृद्ध नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *