Headlines

शेती फायद्याची असेल तरच देशाचा विकास:येवला येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात जाधव यांचे प्रतिपादन‎




खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे सामान्य माणसाच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेतली जात आहेत. भांडवलीकरणामुळे रोजगार आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याचा शेती व्यवसाय फायद्याचा होऊन त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड किशोर जाधव यांनी केले. येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगरात आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती अभिवादन सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी हालगीच्या कडकडाटात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे दिनकर दाणे, ॲड. दिलीप कुलकर्णी, नानासाहेब पटाईत, सय्यद कौसर, संदीप पगारे, नानासाहेब शिंदे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संदीप पगारे यांनी आपल्या मनोगतात बेरोजगारी आणि लग्नसंस्थेवर भाष्य केले. जातीय व्यवस्थेमुळे लग्नसंस्थेला भांडवली स्वरूप आले असून, शेतकरी, मजूर आणि गरीब वर्ग यातून बाहेर फेकला जात आहे. हाताला काम नसल्याने तरुण व्यसनांकडे वळत असून, आत्महत्येसारख्या दुष्टचक्रात अडकत आहेत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.यावेळी दिनकर दाणे, ॲड. दिलीप कुलकर्णी, नानासाहेब पटाईत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चित्ते यांनी केले. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी आत्महत्या करतील, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाकीत आज खरे ठरत आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचा समतेचा विचारच देशाला तारू शकतो, असे कॉम्रेड जाधव म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *