![]()
प्रतिनिधी | नामपूर महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या तिसऱ्या टप्प्यात बागलाण तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. अंमलबजावणीमध्ये तालुका अव्वल स्थानी राहिला असून, आतापर्यंत २०५८ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. ब्राम्हणगांव मंडळातील ९ गावांसाठी संस्कृती लॉन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय अधिकारी महेश शेलार, तहसीलदार कैलास चावडे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक देवेंद्र भावसार आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात ४९० नागरिकांना घरकुल वाटप, रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, जातीचे दाखले, नॉन-क्रिमीलेयर आणि सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती व लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध नोंदी करण्यात आल्या. अनेक लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. एकाच वेळी सर्व दाखले व लाभ मिळाल्याने शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराजस्व शिबिरासाठी आलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. असा उपक्रम राबवणारा बागलाण हा पहिला तालुका ठरला आहे. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, महिला बचत गट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी | उमराणे येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेमुळे उमराणे पंचक्रोशीतील नागरिकांच्या महसुली अडचणी सुटण्यास मदत झाली असून, विविध शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहोचला आहे. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती माता यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. चिंचवे येथील २५ आदिवासी बांधवांना विविध दाखल्यांचे वाटप करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी उमराणे मंडळातील नागरिकांच्या महसुली समस्या सोडवण्यासाठी हे विशेष आयोजन करण्यात आले असून, शेतकरी व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या शिबिराच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, जातीचे व उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रे, ७/१२ दुरुस्ती, प्रलंबित फेरफार, डिजिटल ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पी.एम. किसान नोंदणी, रेशन कार्ड समस्या, ई-मोजणी आणि अकृषिक परवानगी यांसारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे, दुय्यम निबंधक शिंदे, भूमीलेख अधिकारी भाबर यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला बाजार समिती सभापती देवा वाघ, माजी सभापती कान्हू सुकदेव जाधव, धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, भाऊसाहेब देवरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या या समाधान शिबिरात सर्व नागरिकांना लाभ मिळत असून, आता पुढील चौथ्या टप्प्यात नामपूर व टेभे या मंडळात शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी या समाधान शिबिरातून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. – महेश शेलार, उपविभागीय अधिकारी, बागलाण
Source link
महाराजस्व शिबिराच्या तिसऱ्याटप्प्यात बागलाण तालुका प्रथम:एकाच छताखाली 2058लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा लाभ