![]()
मानवीय सेवेत अग्रेसर असणाऱ्या ‘थिओसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस’ (टीओएस) महाराष्ट्राच्या वतीने दिवाळीनिमित्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी बांधवांना सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या आदिवासी कुटुंबीयांच्या घरात प्रकाशाचा उत्सव साजरा झाला. चिखलदरा आणि धारणी तालुक्यांतील सुमारे २५ आदिवासी पाड्यांवर आजही वीजपुरवठा पोहोचलेला नाही. हे सर्व पाडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येतात. या पार्श्वभूमीवर ‘थिओसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस’च्या वतीने मेळघाटातील दुर्गम ‘बिच्छूखेडा’ या छोट्या गावातील ५१ घरांमध्ये सौरदिव्यांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. हे वाटप ‘टीओएस’ अकोला गट आणि ‘अकोला थिओसॉफिकल लॉज’च्या स्वयंसेवकांनी केले. यामध्ये ‘टीओएस’ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत उखळकर, ‘अकोला लॉज’चे अध्यक्ष डॉ. अशोक सोनोने, दिनेश चंदन, रवींद्र बुलनकर, राजाभाऊ बुडूखले यांचा सहभाग होता. यावेळी आदिवासी महिलांना सौरदिवा कसा वापरावा, त्याची देखभाल कशी करावी याचे प्रात्यक्षिक देऊन समजावून सांगितले. ऐन दिवाळीत मिळालेली ही उपयुक्त भेट पाहून आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला. ‘थिओसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस’ ही ‘मराठी थिओसॉफिकल फेडरेशन’शी संलग्न स्वयंसेवी संस्था आहे. ती समाजातील गरजू आणि उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी निरंतर कार्यरत आहे.आदिवासी बांधवांना सौरदिवे देण्याचा हा उपक्रम संस्थेकडून गेल्या चार वर्षांपासून अविरत राबवला जात आहे. हा उपक्रम ‘मराठी थिओसॉफिकल फेडरेशन’, पुणेचे अध्यक्ष ॲड. संजय पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सेवाधारी उपस्थित होते.
Source link
दिवाळीला सौरदिव्यांनी मेळघाटातील बिच्छूखेड्यातील 51 घरांमध्ये ‘उजेड’:"थिओसॅफिकल सर्व्हिस''कडून आदिवासी बांधवांना सौरदिव्यांचे केले वाटप