![]()
संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर अंमल करण्याच्या उद्देशाने अमरावती विद्यापीठाने येथील रुक्मिणीनगरात अभ्यासिका बांधली आहे. या अभ्यासिकेचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे उलटली, परंतु अद्यापही ती सुरु केली नाही. त्यामुळे ज्या उद्देशासाठी ती बांधली गेली, तो उद्देश केव्हा पूर्ण होईल, असा प्रश्न विद्यार्थ्यांद्वारे विचारला जात आहे. ‘शिक्षणासाठी धडपड आणि अंधश्रद्धेवर प्रहार’ असा रोकडा धर्म जगणारे संत गाडगेबाबा यांचे नाव अमरावती विद्यापीठासोबत जोडले आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही पुढे जातो, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात तशी कृती होताना मात्र दिसून येत नाही. नाहीतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी वणवण भटकत खासगी क्लासेसवाल्यांकडे पालकांचे खिसे रिते करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ही हक्काची इमारत केव्हाच उपलब्ध करुन दिली असती, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांद्वारे व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान’ (रुसा) अंतर्गत ४ कोटी ९९ लाखाच्या निधीतून ही इमारत उभारली आहे. मात्र, फर्निचर आणि इतर आवश्यक सोयी-सुविधा अपूर्ण असल्याने ही इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली केली नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बाहेर पैसे खर्च करून खासगी अभ्यासिकेत जावे लागते. त्यामुळे विद्यापीठाची ही इमारत पूर्ण करून ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मते या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु त्यातील फर्निचर आणि इतर जुजबी बाबी अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात ही कामे पूर्ण करुन अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली केली जाईल. मात्र वारंवार सांगितल्या जाणाऱ्या या उत्तरामुळे विद्यार्थी समाधानी नाहीत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने रुक्मिणीनगरात बांधलेली हीच ती अभ्यासिका. …तर आंदोलन करण्यात येणार विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही इमारत लवकरात लवकर उपयोगात यावी, अशी मागणी मी गेल्या सिनेट बैठकीत केली होती. त्यावेळी कुलगुरुंनी काहीसा वेळ मागितला होता. आता त्या बैठकीलाही सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने तीव्रतर हालचाली करुन हा मुद्दा तडीस न्यावा, अन्यथा मी आंदोलन करणार आहो, असे मत पदवीधरांचे प्रतिनिधी असलेले सिनेटर प्रा. कैलास चव्हाण यांनी व्यक्त केले.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विद्यापीठाची अभ्यासिका दोन वर्षांपासून उपयोगाविना पडून, ना प्रवेश-ना अभ्यास, रुक्मिणीनगरात 4.99 कोटींचा झाला खर्च