Headlines

दिव्य मराठी विशेष:मज्जा येईल तोपर्यंत काम करत राहा, कंटाळा आला की रिटायर व्हा- अभिनेते प्रशांत दामले




नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूरमध्ये आलेले ‘विक्रमवीर’ अभिनेते प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार अनीश सहस्रबुद्धे यांनी घेतली. नाट्य क्षेत्रातील पदार्पणापासून ते १३ हजारांहून अधिक प्रयोगाच्या विक्रमापर्यंतचा प्रवास दामले यांनी यात उलगडला. सोलापुरी बाराबंदी वेशभूषेत प्रशांत दामले हे मुलाखतीसाठी व्यासपीठावर आले. दामले यांच्या मुलाखतीचा हा संपादित भाग… १३,५५२ नाट्यप्रयोगांचा टप्पा ओलांडलात, ही सुरुवात कशी झाली? १९८३ ला ‘टुरटुर’ नाटकापासून सुरुवात झाली. प्रत्येक नाटक हा एक प्रयोग असतो. एका नाटकात मी ६ वेळा कपडे बदलतो, आतापर्यंत ८० हजारांहून अधिक वेळा कॉस्च्यूम बदलले. आजचा ‘बाराबंदी’चा पोशाख अविस्मरणीय राहील. यश प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर अवलंबून असते. ४४ वर्षांपासून अभिनय करताना कंटाळा येत नाही का? अजिबात नाही. १९८३ ते २००८ मी फक्त अभिनेता होतो. २००५ पासून निर्माता झालो. नेहमी नवीन काहीतरी करण्याची इच्छा असेल तर कंटाळा येत नाही. मज्जा वाटेपर्यंत काम करायचे आणि कंटाळा येईल तेव्हा रिटायर व्हायचे. या प्रवासातील संघर्षाबद्दल काय सांगाल? कुटुंबाची साथ खूप महत्त्वाची असते. आधी मी नोकरी करत काम करायचो. नंतर पूर्णवेळ रंगभूमीवर करिअर करण्याचे ठरवले आणि निर्णयाला पत्नीनेही मोलाची साथ दिली. रंगभूमी आणि चित्रपट यापैकी कशाला प्राधान्य द्याल? पूर्वी नाटक, चित्रपट व मालिका क्रम होता. आता लोक मालिकांकडून नाटकाकडे येतात. रंगभूमीवर आवाजाची ताकद, उच्चार महत्त्वाचे असतात, जे मालिकांमधून येणाऱ्यांमध्ये कमी आढळते. शिकायचे असेल तर आधी नाटकात काम करावे. आवडलेले पण न चाललेले नाटक कोणते? ‘बहुरूपी’मध्ये डबल रोल होता, ते चालले नाही. ‘नकळत दिसले सारे’ सामाजिक उपक्रम म्हणून केले. त्यातून नेत्रदानाचे फॉर्म भरले. तोटा ‘गेला माधव कुणीकडे’मधून भरून काढला. दिग्गज दाबतील अशी भीती वाटली का? इतरांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे असते. उणिवा दूर करून पुढे जाणे हीच यशाची पायरी आहे. मराठी रंगभूमीचे भविष्य काय? भविष्य उज्ज्वल आहे. मुलांना शालेय वयापासून नाटक बघायची सवय लावल्यास प्रेक्षकवर्ग तयार होईल. नाट्यतपस्वी म्हणून ओळख निर्माण व्हावी या कार्यक्रमात रोहित देशमुख यांनी एक प्रस्ताव मांडला. प्रशांत दामले यांच्या नावाने पहिला नाट्य महोत्सव सोलापुरात होत आहे. वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते प्रशांत दामले यांची ‘नाट्यतपस्वी’ म्हणून ओळख निर्माण व्हावी, हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सोलापूरकर पाठपुरावा करतील, अशी ग्वाही देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *