Headlines

शेतकऱ्यांची चिंता वाढली:पावसाचा तिसरा महिना संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात केवळ 29% पाऊस




ऑगस्ट महिना संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. तालुक्यात आतापर्यंत मोसमाच्या सरासरीच्या अवघा २९ टक्के पाऊस झाला असून, ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकांनी मान टाकली आहे. पाण्याअभावी ५६ हजार हेक्टरवरील खरीप पिके सुकू लागली आहे. तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही मोठा पूर आला नाही. परिणामी विहिरींनी तळ गाठला असून, परिसरातील पाझर तलाव आणि मुख्य सिंचन प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत. सध्या मका पिकाला तुरा येत असून कपाशीला फुले व पाते लागत आहेत. मात्र, पावसाच्या मोठ्या खंडाने मक्याची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, तर कपाशीची फुलपाते गळू लागली आहेत. तालुक्यातील ५६,७११ हेक्टर एकूण कृषी क्षेत्रापैकी ५६,६५९ हेक्टरवर जवळपास १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक २४,६७२ हेक्टरवर मका, १८,५८७ हेक्टरवर कापूस, ४,४११ हेक्टरवर अद्रक आणि ३,२१० हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. तालुक्यात मंडळनिहाय पावसाची अत्यंत बिकट नोंद ऑगस्ट महिन्यात तालुक्यात अवघ्या २९.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाबरा मंडळात ४५ मिमी, फुलंब्री ३६.८ मिमी, वडोद बाजार २९.९ मिमी, आळंद २६.१ मिमी, तर पीरबावडा मंडळात सर्वात कमी म्हणजे अवघा १०.३ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी केवळ २९ मिमी पाऊस झाल्याने जिरायती आणि बागायती अशा दोन्ही प्रकारची शेती संकटात सापडली आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, शासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *