Headlines

घर बांधण्यास 5 लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ:सिल्लोड शहर पोलिस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल‎




माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना शुक्रवारी सिल्लोड शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहिता मोनिका अविनाश गायकवाड (३२) यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अविनाश सोनाजी गायकवाड, सासू लिलाबाई सोनाजी गायकवाड (दोघे रा. पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर), नातेवाईक प्रतापराव रामराव मोरे व अनिता प्रतापराव मोरे (दोघे रा. राधास्वामी रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी संगनमत करून मोनिका यांच्याकडे माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. पैसे आणण्यास नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याशिवाय, त्यांच्या मुलगा व मुलीला स्वतःच्या ताब्यात ठेवून मोनिका यांना घरातून हाकलून देण्यात आले. माहेरहून पैसे आणले नाहीस तर जिवंत माहेरी जाऊ देणार नाही, अशी धमकीही त्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *