Headlines

नवरात्रोत्सव‎:तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने दुमदुमली पाथर्डी नगरी




हळद-कुंकवाची मुक्त उधळण, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी आणि तुळजाभवानी माता की जय या जयघोषात भाविक भक्तिरंगात न्हाऊन निघाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची ऐतिहासिक व मानाची पालखी चौथ्या माळेनिमित्त बुधवारी शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनाने शहरवासीयांसह भाविक भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठिकठिकाणी झालेली स्वागताची तयारी, महिलांनी केलेले औक्षण, खणानारळाने भरलेली ओटी आणि रांगोळ्यांनी पालखी मार्ग सजला होता. पालखीचे शहरात आगमन होताच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. अजिंठा चौकातून सुरू झालेली पालखी मिरवणूक गणेश पेठ, जय भवानी चौक, सुतारगल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ब्राह्मणगल्ली मार्गे शनी मंदिराजवळ पोहोचली. मार्गावरील विविध ठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन करून मातेचे दर्शन घेतले. पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने शहरातील वातावरण भारावून गेले होते. या पालखी सोहळ्यात दोनशे किलो हळद-कुंकू आणि चारशे किलो फुलांची उधळण करण्यात आली. हळद-कुंकवाच्या लाल-पिवळ्या रंगांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी पालखीचा मार्ग सजला होता. रस्त्यांवर ठिकठिकाणी सडा-रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. महिला भाविकांनी श्रद्धापूर्वक पालखीचे औक्षण केले मनोभावे दर्शन घेतले. हात जोडून उभे असलेले भाविक, मातेच्या नावाचा अखंड जयघोष आणि फुलांच्या वर्षावात मार्गक्रमण करणारी पालखी असे उत्साहाचे विलोभनीय चित्र शहरात पाहायला मिळाले. पालखी सोहळा उत्सव समितीच्यावतीने भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्वागताची व्यवस्था करण्यात आली होती. उशिराने पालखी दाखल होऊनही दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव कमी झाला नाही. मातेच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांनी जयघोषात पालखीचे स्वागत करत भक्तिभावाचा अनोखा आविष्कार घडविला. पालखीच्या दर्शनासाठी शहरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी नागरिक या पालखीचे स्वागत करत होते. देवी मातेच्या जयघोषाने परिसरात दुमदुमून गेला होता. लहान मुलांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. परिसरातही धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मढी देवस्थानचे विश्वस्त अनिल साठे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रतीक खेडकर, प्रशांत शेळके, मंगेश भागवत, अजय साठे यांनी विशेष परिश्रम घेतले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाथर्डी शहर व तालुक्यात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवी मातेच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. श्री क्षेत्र मोहटादेवी मंदिरातही भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे. देवी मातेच्या जयघोषाने मंदिरांचा परिसर दुमदुमून गेला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *