Headlines

गाढेजळगावच्या डोंगरावर 9 दिवस महिला भाविकांचा मुक्काम:श्री रेणुकामातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भाविकांची मांदियाळी




करमाडपासून पूर्वेला सुमारे सहा किलोमीटर अंतरावर गाढेजळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत श्री रेणुकामातेचे अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंदिर वसलेले आहे. पंचक्रोशीतील २५ ते ३० गावांतील हजारो भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात सध्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सुमारे ७५० वर्षांहून अधिक काळापासून देवीची स्वयंभू मूर्ती येथे विराजमान असल्याचे मानले जाते. दरम्यान, नवरात्रातील नऊ दिवस महिला गडावरील सिमेंटच्या ओट्यांवर राहुट्या टाकून मुक्काम करतात. सकाळच्या आरतीनंतर नामस्मरण, पूजाअर्चा आणि विविध धार्मिक उपक्रमांत महिला उत्साहाने सहभागी होतात. गाढेजळगावच्या डोंगरावर घनदाट जंगल आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर डोंगरची देवी म्हणून संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील अनेक गावांतील भाविक रेणुकामातेला आपले कुलदैवत मानतात. नवरात्रोत्सवात दररोज सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या भावपूर्ण महाआरतीसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. नवरात्रातील सातव्या माळेला या देवस्थानात विशेष महत्त्व असल्याने, या दिवशी गडावर यात्रेचे भव्य स्वरूप निर्माण होते. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी गाढेजळगाव येथील ग्रामस्थांनी एकजुटीने मंदिर परिसराची स्वच्छता केली असून, मंदिराची आकर्षक रंगरंगोटी आणि नयनरम्य विद्युत रोषणाई केली आहे. मंदिराच्या देखभालीसाठी कोणतीही स्वतंत्र अधिकृत समिती नसली, तरीही स्थानिक ग्रामस्थ सर्वानुमते गडाची सर्व देखभाल व व्यवस्थापन करतात. नवरात्रोत्सवानिमित्त गडावर श्री सप्तशती पाठ, हरिपाठ, काकडा भजन, भागवत पूजा, होमहवन तसेच दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. भक्तिभावाने नटलेल्या प्रसन्न वातावरणात भाविक देवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा करत आहेत, अशी माहिती मंदिराचे पुजारी प्रवीण मंगलमूर्ती पुराणिक आणि प्रमोद मंगलमूर्ती पुराणिक यांनी दिली. बाळाला मांडीवर घेतलेली मूर्ती हे खास वैशिष्ट्य माहूरगडासह राज्यातील अनेक रेणुकामाता मंदिरांमध्ये देवी तांदळा अर्थात मुखवट्याच्या स्वरूपात पूजली जाते. मात्र, गाढेजळगाव येथील डोंगरावरील मंदिरातील रेणुकामातेची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीने बाळाला मांडीवर घेतलेले वात्सल्यरूप या मूर्तीमध्ये पाहायला मिळते. सुमारे साडेपाच फूट उंचीची शेंदूरवर्णीय आणि उत्तरमुखी मूर्ती येथे विराजमान आहे. ही स्वयंभू मूर्ती ७५० वर्षांहून अधिक काळापासून येथे स्थापित असल्याने, या देवस्थानाला ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात आलेले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. सध्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *