![]()
तालुक्यात गेल्या २२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बहरात आलेली खरीप पिके पाण्याच्या तीव्र प्रतीक्षेत आहेत. कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, अनेक भागांत सोयाबीन, कापूस, मका व तूर या पिकांची पाने पिवळी पडू लागली आहेत. पिकांची वाढ पूर्णपणे खुंटण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पैठण तालुक्यात एकूण ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये तब्बल ४९ हजार ९४२ हेक्टरवर एकट्या कपाशीची लागवड असून, ते तालुक्यातील मुख्य पीक आहे. सध्या कपाशी व सोयाबीन पिके वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या नाजूक वळणावरच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. तालुक्यात मका २,४०८ हेक्टर, बाजरी १,६८७ हेक्टर, तूर १,३२५ हेक्टर आणि सोयाबीन १,०३० हेक्टर क्षेत्रावर आहे. जमिनीतील ओलावा संपत आल्याने पिकांची पाने पिवळसर पडत असून, वाढ खुंटली आहे. हलक्या आणि माळरानावरील जमिनीतील पिकांची परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याचे स्थानिक शेतकरी दीपक मोरे यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन दिवसांत चांगला पाऊस न पडल्यास पिके हातातून जाण्याची भीती आहे. पावसाची आणखी ओढ ठरणार धोकादायक अधूनमधून झालेल्या सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर पिकांनी आतापर्यंत कसाबसा तग धरला होता. मात्र, सलग २२ दिवसांच्या उघडीपीमुळे कपाशीला पाते, फुले लागण्याच्या आणि सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या टप्प्यावर पाण्याचा तीव्र ताण निर्माण झाला आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट निश्चित मानली जात आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा Ãशेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. पिकांच्या गरजेनुसार उपाययोजना करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन करावे. – विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी, पैठण
Source link
कपाशीला सर्वाधिक फटका:22 दिवसांपासून पावसाची दडी; पैठणमध्ये 78 हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात