![]()
आयफोन घेऊन देण्यास नकार दिल्याने मुलासह आई-वडिलांनी डोंगरावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) वाळूज एमआयडीसी हद्दीत घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मात्र, या भीषण घटनेमुळे तिसगाव परिसरातील मुख्य धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या खवड्या डोंगराचे एक अत्यंत भयानक वास्तव समोर आले आहे. हा डोंगर आता केवळ नैसर्गिक डोंगर राहिलेला नसून वारेमाप अवैध उत्खननामुळे तो थेट मृत्यूचा सापळा म्हणजेच ‘सुसाइड पॉइंट’ बनला आहे. डोंगराची पाहणी केल्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि निसर्गाच्या ऱ्हासाचे वास्तव समोर आले आहे. कड्याभोवती कुंपण न घातल्यास आणखी बळी जातील : एका बाजूला डोंगर पोखरून पर्यावरणाचा विनाश केला जात आहे. दुसरीकडे तोच पोखरलेला डोंगर आता माणसांचे बळी घेत आहे. चांदगुडे कुटुंबाची घटना हे प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. या कड्याच्या परिसरात तातडीने मजबूत कुंपण उभारावे, सुरक्षा रक्षकांची नेमणू करावी, अन्यथा खवड्या डोंगर भविष्यात असेच अनेकांचे बळी घेत राहील. काही वर्षांपूर्वी या डोंगरात उत्खननाची परवानगी होती. मात्र, आता उत्खननाला परवानगी नसल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अवैध उत्खननावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अवैध उत्खननाने जीवघेणा कडा खवड्या डोंगरावर गेल्या काही वर्षांत महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अफाट अवैध उत्खनन झाले आहे. यंत्रांच्या साहाय्याने डोंगराचे अक्षरशः लचके तोडल्यामुळे डोंगराचा एक भाग पूर्णपणे कापला गेला आहे. या कटिंगमुळे तेथे सुमारे २४६ फुटांचा एक सरळसोट आणि सपाट कडा तयार झाला आहे. नैसर्गिक उतार नष्ट झाल्याने हा कडा आता थेट मृत्यूच्या दरीसारखा झाला आहे. तळाशी तीक्ष्ण खडक, पाण्याचे डबके डोंगरावरून घेतलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट दिसते की, उत्खननामुळे कड्याच्या तळाशी मोठी दरी आणि विवरे तयार झाली आहेत. या दरीत उत्खननामुळे तयार झालेले अत्यंत तीक्ष्ण खडक आणि मोठे पाण्याचे डबके साचले आहेत. सुमारे २५० फुटांवरून उडी घेतल्यास किंवा चुकून पाय घसरल्यास थेट या दगडांवर आपटून जागीच मृत्यू निश्चित आहे. खाली पडलेला व्यक्ती वाचण्याची जराशीही शक्यता उरत नाही. डोंगरावर सुरक्षेचा पूर्णपणे अभाव धोकादायक ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. डोंगराच्या वरच्या बाजूला हिरवळ आणि सपाट जमीन असल्यामुळे कोणीही व्यक्ती थेट या कड्याच्या टोकापर्यंत सहज पोहोचू शकते. प्रशासनाने या २४६ फुटी कड्यावर कुंपणही घातलेले नाही. येथे कोणताही सुरक्षा रक्षक किंवा धोक्याचा इशारा देणारा फलक नाही. त्यामुळेच नैराश्यात असलेल्या व्यक्ती येथे पोहोचून टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या, गुन्ह्यांचे केंद्र अवैध उत्खननाने तयार झालेली ही दरी आता आत्महत्यांचे आणि गुन्ह्यांचे केंद्र बनली आहे. प्रशासनाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार, गेल्या चार वर्षांत तब्बल १३ व्यक्तींनी याच ठिकाणाहून उडी घेत आपले जीवन संपवले आहे. शिवाय हे ठिकाण निर्जन असल्याने गुन्हेगारांचेही फावले आहे. गेल्याच वर्षी एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला याच कड्यावरून ढकलून देत तिचा खून केल्याची घटना घडली होती. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगर हादरले:आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू; धक्का बसलेल्या आईनेही मारली उडी छत्रपती संभाजीनगर शहरात आज एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर, आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि मुलाचा झालेला करुण अंत पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईनेही त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण संभाजीनगर जिल्हा हादरला आहे. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगरातील खवड्याचा कडा ठरतोय सुसाइड पॉइंट:डोंगराच्या कड्यावरून पडल्याने तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षेचा प्रश्न चर्चेत, 4 वर्षांत 13 जणांनी संपवली जीवनयात्रा