Headlines

दीड लाखांचे ६९० पोते जिप्सम खत पकडले:राजस्थानमधून थेट कळमनुरीच्या मसोड येथे आला होता ट्रक, कृषी विभागाची सतर्कता




कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे जिप्सम खताचे पोते घेऊन आलेला राजस्थानातील ट्रक कृषी विभागाच्या पथकाने शनिवारी ता. १६ पकडला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात जिप्समचे ६९० पोते आढळून आली असून त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा मिळाव्यात तसेच बोगस खताची विक्री होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कृषी विभागाला दिल्या होत्या. या शिवाय कृषी विभागाला आवश्‍यक त्यावेळी तातडीने पोलिस मदत देण्याबाबत सूचना पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हयाचा कृषी विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे एका ट्रकमधून जिप्सम नावाचे खत विक्री केले जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, कृषी अधिकारी पंकज राठोड यांच्या पथकाने तातडीने मसोड येथे जाऊन पाहणी केली असता एका ट्रकमधून शेतकऱ्यांना पोते दिले जात असल्याचे दिसून आले. या पथकाने ट्रकमध्ये पाहणी केली असता त्यात जिप्सम खत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने कळमनुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या पथकाने मसोड येथे जाऊन ट्रक ताब्यात घेतला. सदर ट्रक कळमनुरी पोलिस ठाण्यात आणल्या नंतर त्यात जिप्सम खताचे ६९० पोते असल्याचे आढळूुन आले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *