Headlines

दुर्गाडी किल्ल्यावर पुन्हा धार्मिक तणाव; बकरी ईदच्या नमाजवरून भाजप-शिवसेना आक्रमक:कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढले




कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाने ईदच्या दिवशी दुर्गाडी देवी मंदिरात हिंदू भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरुवारी सकाळपासूनच किल्ला परिसरात आंदोलन सुरू झाले असून काही कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढल्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत प्रशासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर असून पायथ्याशी ईदगाह आहे. या दोन धार्मिक स्थळांमुळे गेल्या अनेक दशकांपासून येथे वादाची परिस्थिती कायम आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की, ही जागा मूळ दुर्गा देवी मंदिराची आहे, तर मुस्लिम समाजाकडून ती ईदगाह असल्याचा दावा केला जातो. हा संपूर्ण वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, प्रत्येक वर्षी बकरी ईदच्या काळात या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाते. या वर्षीच्या आंदोलनात शिवसेना शिंदे गटासोबत भाजपनेही सक्रिय सहभाग घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही शिवसेना स्वतंत्रपणे आंदोलन करत असताना यंदा भाजपच्या सहभागामुळे या आंदोलनाला अधिक राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याची चर्चा आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाला अन्यायकारक ठरवत हिंदू भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारला जात असल्याचा आरोप केला. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त उभारला आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील घंटानाद आंदोलनाची परंपरा देखील यंदा कायम ठेवण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिवंगत आनंद दिघे यांनी 1982 मध्ये हे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर दरवर्षी बकरी ईदच्या काळात हे आंदोलन होत आले आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा संघर्ष कायम असून न्यायालयीन निर्णय होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाकडून नियम लागू केले जातात. सणासुदीच्या काळात येथे अहोरात्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. दुर्गाडी किल्ला परिसर पुन्हा एकदा चर्चेत केंद्रस्थानी दरम्यान, जिल्हा प्रशासनाने किल्ला परिसरात वर्षभर कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जारी केले आहेत. तरीही बकरी ईदच्या दिवशी नमाज आणि मंदिर प्रवेशबंदी या मुद्द्यांवरून दरवर्षी वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यंदाही आंदोलन, घोषणाबाजी आणि वाढलेला राजकीय सहभाग यामुळे दुर्गाडी किल्ला परिसर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक चर्चेत केंद्रस्थानी आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *