Headlines

दुर्मिळ अजगराला जीवनदान:अमानतपूर येथे सर्पमित्रांनी 25 फूट खोल विहिरीतून काढला नऊ फुटांचा अजगर




शहरापासून जवळच असलेल्या अमानतपूर येथील शेतकरी विनोद मुरूमकार यांच्या २५ फूट खोल विहिरीत पडलेल्या सुमारे ९ ते १० फूट लांबीच्या अजगराला सर्पमित्रांनी धाडसी मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे दुर्मिळ अजगराला जीवनदान मिळाले आहे. अमानतपूर येथील विनोद मुरूमकार यांच्या शेतातील २५ फूट खोल विहिरीत मोठा अजगर पडल्याचे गावातील प्रज्ज्वल वाघ, सर्वेश वानखडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बाळ काळणे, सर्पमित्र गौतम बोदडे, अक्षय चौधरी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी आणि लोखंडी शिडी एकाच ठिकाणी असल्याने पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक होते. पोहताना अजगर आणि व्यक्ती एकत्र आल्यास अजगराच्या विळखा मारण्याच्या पद्धतीमुळे जीवितहानी होण्याचा धोका होता. त्यामुळे सर्पमित्रांनी सुरुवातीला वरून दोर टाकून अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्यामुळे सर्पमित्र गौतम बोदडे, अक्षय चौधरी यांनी लोखंडी शिडीवरून खाली उतरत अत्यंत सावधानतेने अजगराला पकडले. गौतम बोदडे यांनी अजगराला व्यवस्थित पकडून अक्षय चौधरी यांच्या हातात सोपवले. तसेच त्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर आणले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘अजगराला वाचवा’ हा संदेश केवळ सांगून न थांबता कृतीत आणला. आतापर्यंत त्यांनी ७० पेक्षा अधिक अजगरांचे यशस्वी रेस्क्यू करून, वेळप्रसंगी त्यांच्यावर उपचार करत त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *