Headlines

दुष्काळाच्या सावटाखाली मूर्तिजापूर तालुक्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात:नऊ दिवसांचे उपवास आणि जागरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन ‎




एकीकडे तालुक्यात दुष्काळ असतानाच दुसरीकडे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. खरीप पिकांचे नुकसान, पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांची आर्थिक चिंता अशा प्रतिकूल परिस्थितीतही भाविकांची देवीवरील श्रद्धा कायम आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवींची स्थापना, विधिवत घटस्थापना, नऊ दिवसांचे उपवास, पूजा, आरती, जागरणातून आदिशक्तीची आराधना केली जात आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव श्रद्धा, आशा, नव्या उभारीचा संदेश घेऊन आला आहे. रविवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये नवदुर्गांचे आगमन झाले. काही ठिकाणी राजकीय वलय असलेल्या नवदुर्गा मंडळांनी शक्तिप्रदर्शन केले. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घराघरांत घटस्थापना करून देवीची विधिवत पूजा करण्यात आली. पूजास्थळी घटस्थापना करणे, मातीमध्ये धान्य पेरणे, अखंड दीप प्रज्वलित ठेवणे, देवीला फुले, हार, कुंकू, अक्षता, नैवेद्य अर्पण करणे अशा पारंपरिक विधींना महत्त्व देण्यात आले. मूर्तिजापूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रातील नऊ दिवस देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. अनेक भाविक नऊ दिवस उपवास करीत आहेत. काही जण फलाहार, काही एकवेळ भोजन, तर काही आपल्या धार्मिक परंपरेनुसार व्रत पाळतात. देवीच्या नामस्मरणात दिवस घालविणे, पूजा करणे आणि रात्री जागरण करून भजन-कीर्तन करणे, यांतून भाविक आपली श्रद्धा व्यक्त करतात.महिला वर्गात नवरात्रोत्सवाबाबत विशेष उत्साह असतो. देवीची ओटी भरणे, आरती करणे, पारंपरिक धार्मिक विधी पार पाडणे आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणे, अशा उपक्रमांतून धार्मिक परंपरा जपली जात आहे. नवरात्र हा केवळ धार्मिक विधींचा उत्सव नसून स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा आणि समाजाला सकारात्मकतेची प्रेरणा देणारा उत्सव आहे. दुर्गेच्या विविध रूपांची आराधना करताना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, संकटांवर मात करण्याची शक्ती आणि समाजात एकोपा टिकविण्याचा संदेश दिला जातो. उत्सव साजरा करताना पाण्याची बचत, स्वच्छता, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि सार्वजनिक शिस्त यांनाही प्राधान्य देणे आवश्यक आहे.एकीकडे दुष्काळामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण आहे, तर दुसरीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह कायम आहे. अशा वेळी धार्मिक श्रद्धा जपत अनावश्यक खर्च टाळणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि गरजू कुटुंबांना शक्य ती मदत करणे, ही काळाची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *