![]()
“देशातील लोकशाही आणि संविधानाची उघड लूट सुरू असताना, न्याय मागणारे सर्व संविधानिक मार्ग बंद झाले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील शिष्टमंडळासह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची भेट मागितली होती. सुरुवातीला वेळ देऊन नंतर अचानक ‘राजकीय नेत्यांना भेटण्याचा अधिकार नाही’ असे सांगत सरन्यायाधीशांनी स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले. 80 हून अधिक न्यायाधीश लंडनमध्ये जाऊन राजकीय नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात, मुख्यमंत्र्यांच्या डिनर पार्ट्यांना हजेरी लावतात, तेव्हा चालते; मग देशातील कोट्यवधी जनतेच्या वतीने मतचोरीचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते आले तर दरवाजे का बंद करता? हा इतिहास सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेची नोंद नक्की ठेवेल,” असा स्फोटक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावरील पायी मोर्चा, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील आक्षेप, दिल्लीतील पोलिसांची नाकेबंदी, मुंबईतील आंदोलने आणि पुण्यातील एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या निकालावर परखड भूमिका मांडली. न्यायालयाचे दरवाजे बंद; सरन्यायाधीशांनी जनतेकडे पाठ फिरवू नये सरन्यायाधीशांनी राहुल गांधी यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी सडकून टीका केली. “माझ्या माहितीनुसार सुरुवातीला आज दुपारी 4 ते 5च्या दरम्यान भेटीची वेळ निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काल रात्री अचानक ‘राजकीय नेत्यांना भेटण्याचा अधिकार नाही’ अशी भूमिका घेण्यात आली. जेव्हा देशातील प्रत्येक संस्था मोदी-शहांच्या दबावाखाली काम करत आहे, तेव्हा अखेरचा आधार म्हणून विरोधक सर्वोच्च न्यायालयात जात होते. तिथेच जर दरवाजे बंद होत असतील, तर जनतेने न्याय मागायला कोणाकडे जायचे?” लंडन दौऱ्याचा आणि डिनर पार्ट्यांचा दाखला “सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना जातात, मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात आणि लंडनमध्ये जाऊन राजकीय नेत्यांशी बॅडमिंटन खेळतात, हे देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. आम्ही काय घरी लग्नकार्याचे किंवा गणपतीच्या आरतीचे आमंत्रण द्यायला जात होतो का? आम्ही देशातील मतचोरी, ईव्हीएममधील घोटाळे आणि संविधानावरील हल्ले मांडायला जात होतो. न्यायालये ही जनतेची आणि संविधानाची आहेत, हे विसरू नका.” ‘इंडिया’ आघाडीचा सुप्रीम कोर्टावर पायी मोर्चा; राहुल गांधी ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’ दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनाची माहिती देताना त्यांनी सांगितले, “आज ‘इंडिया’ आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्ष, खासदार आणि नेते पायी चालत सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. न्यायालय उघडे असेल तर आम्ही तिथे जाऊन आमचे म्हणणे मांडू; 24 तास नाही तर केवळ 24 मिनिटे आमचे ऐकून घ्या, हीच आमची मागणी आहे.” “दिल्लीत लाखो सशस्त्र पोलीस बंदुका घेऊन दडपशाही करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आंदोलनाची अचूक दिशा आणि रणनीती ऐनवेळी राहुल गांधी ठरवतात आणि जाहीर करतात. या संपूर्ण लढ्यात राहुल गांधी हेच मुख्य रणनीतिकार आहेत.” न्यायालयाच्या अवमानावर वॉरंट काढा “काल न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते की मेट्रो स्टेशन्स बंद करू नका. तरीही आज सर्वोच्च न्यायालय परिसरातील सर्व मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. जर हा न्यायालयाचा अवमान असेल, तर सरन्यायाधीशांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि नायब राज्यपालांविरोधात तत्काळ वॉरंट काढावे.” पोलिसांचा क्रूर चेहरा; आदिवासी महिलेला लहान मुलासह फरपटले! आंदोलकांवर होणाऱ्या पोलीस कारवाईचा निषेध करताना राऊत यांनी धक्कादायक प्रकरणावर बोट ठेवले. “काल आंदोलनादरम्यान एका आदिवासी महिलेला तिच्या लहान बाळासह पोलिसांनी फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. ही लोकशाही नसून क्रूर हुकूमशाही आहे. मी स्वतः हे छायाचित्र आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला टॅग करून ट्विट केले आहे, जेणेकरून जगाला समजेल की भारतात संविधानाची कशी पायमल्ली चालली आहे.” आदित्य ठाकरेंवर गुन्हे दाखल “मुंबईत आंदोलने केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. होऊ द्या गुन्हे! ते लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तुषार गांधींना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्यानंतर मुंबईत हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलीस ठाण्यांना घेराव घातला.” 124 माजी IAS अधिकाऱ्यांना फडणवीसांनी खाकी चड्ड्या घातल्या आहेत! निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या 124 अधिकाऱ्यांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. “देवेंद्र फडणवीसांनी ज्या 124 अधिकाऱ्यांचा दाखला दिला आहे, त्या अधिकाऱ्यांना त्यांनी खाकी हाफ चड्ड्या घातलेल्या आहेत. ते सगळे खाकी निकरवाले आहेत. ज्या दिवशी केंद्रात सत्तापालट होईल, त्या दिवशी हेच अधिकारी पुन्हा फुल पॅण्टमध्ये येतील आणि आमच्या बाजूने उभे राहतील. अधिकारी कोणाचे नसतात.” पुण्यातील MPSC आंदोलन आणि ज्ञानेश कुमारांचा राजीनामा पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. “पुण्यात हजारो मुले 9 दिवसांपासून रस्त्यावर बसली होती. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर सरकारने अखेर चौकशीचा मार्ग काढला, हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. आता जी चौकशी होईल, त्यातून काय सत्य बाहेर येते ते पाहू.” ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ तसाच लढा “ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या ‘च’ वर जोर होता, त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ‘जावेच लागेल’. ते आज ना उद्या पायउतार होणारच, यात तिळमात्र शंका नाही,” असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी शेवटी केला. ———————————————————————– हेही वाचा… ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक: आज राज्यभर स्वाक्षरी मोहीम, राज ठाकरे शिवाजी पार्कवर लावणार हजेरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेकडून आज राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मोहिमेत सहभागी होणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
संजय राऊतांचा थेट सरन्यायाधीशांना सवाल:लंडनमध्ये नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळता, डिनर पार्ट्यांना जाता; मग राहुल गांधींना भेटायला CJIचे दरवाजे बंद का?