Headlines

Rohit Pawar On MPSC Protest Success; Corruption Probe To Begin In Pune


“विजय विद्यार्थी एकजुटीचा… विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा… आणि चिकाटीचा…” अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सलग 11 दिवस पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचे स्वागत केले आहे.

.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या यशानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, या यशात साथ देणाऱ्या सरकार आणि प्रशासनाचेही आभार मानले आहेत.

दोन महिन्यांत ‘दूध का दूध, पाणी का पाणी’

रोहित पवार यांनी सांगितले की, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलकांशी यशस्वी चर्चा केली. २०२१ पासूनच्या सर्व पेपरफुटीच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ च्या चौकशी कायद्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाच्या सचिवपदी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची, तर सदस्य म्हणून न्या. पी. डी. नाईक, पोलीस अधिकारी लखमी गौतम आणि सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

“येत्या दोन महिन्यांत या चौकशीच्या माध्यमातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल आणि आयोगातील सर्वच आजी-माजी भ्रष्ट अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी यांचा खरा चेहरा पुढे येईल,” असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

‘राजस्थान पॅटर्न’ आणि सर्व परीक्षा ऑफलाईन

यापुढील एमपीएससीच्या सर्व परीक्षा ‘ऑफलाईन’ पद्धतीनेच घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, राजस्थानच्या धर्तीवर १०० रुपयांच्या एकाच कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा देण्याची सुविधा लागू करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त वेळेत निकाल लावणे, प्रतीक्षा यादी लावणे, रिक्त जागा भरणे आणि जागांमध्ये वाढ करणे अशा १४ महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे, तसेच क्लासचालक आणि टेलिग्राम चॅनेल चालकांना दिलेल्या नोटिसाही मागे घेण्याचे सरकारने मान्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासनाचे मानले आभार

सत्याग्रहाची सांगता पुण्याच्या एस. एम. जोशी पुलावर हजारो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात झाली. या ऐतिहासिक लढ्यात साथ दिल्याबद्दल रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि क्लास चालकांचे आभार मानले. विशेष म्हणजे, सरकारच्या दबावातही सहकार्याची भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचेही रोहित पवार यांनी या पोस्टमधून विशेष आभार मानले आहेत.

भविष्यात एमपीएससीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मुळासकट निघेल आणि राज्याला गुणवत्ता असलेले प्रामाणिक अधिकारी मिळतील, अशी आशा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी…

विजय विद्यार्थी एकजुटीचा…

विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा…

विजय विद्यार्थ्यांच्या चिकाटीचा…

महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने गेल्या अकरा दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्याग्रहाला भेट देऊन आंदोलकांशी यशस्वी चर्चा केली आणि २०२१ पासूनच्या सगळ्या पेपरफुटीच्या चौकशीसाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ च्या चौकशी कायद्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली. विशेष म्हणजे आयोगाच्या सचिवपदी स्वच्छ प्रतिमेचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी मा. तुकाराम मुंडे साहेब यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये न्या. पी. डी. नाईक, पोलीस अधिकारी लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचाही समावेश आहे. ही चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या दबावामुळं MPSC अध्यक्ष भिमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं येत्या दोन महिन्यात चौकशीच्या माध्यमातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊन आयोगातील सर्वच आजी-माजी भ्रष्ट अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी या सर्वांचाच खरा चेहरा पुढं येईल.

महत्त्वाचं म्हणजे यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा, राजस्थानच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घेण्याचा, वेळेत निकाल, प्रतिक्षा यादी लावणं, रिक्त जागा भरणं, जागांमध्ये वाढ यासह विद्यार्थ्यांच्या इतर १४ मागण्याही सरकारने मान्य केल्या. तसंच विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि विद्यार्थी, क्लासचालक व टेलिग्राम चॅनल चालक यांना दिलेल्या नोटीसाही मागे घेण्याचं सरकारने मान्य केलं. हा विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक एकजुटीचा विजय आहे. याबाबत सत्याग्रह सुरु असताना उपोषणाला बसलेले आणि गेली अकरा दिवस रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन! विद्यार्थी सत्याग्रहाची सांगता अशा प्रकारे गोड होताच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला… हा जल्लोष आणि हा आनंद शब्दांच्या पलिकडे होता, यातूनच विद्यार्थी या भ्रष्ट व्यवस्थेला किती वैतागले आहेत, हेच स्पष्ट होतं.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेले सर्वपक्षीय नेते मंडळी, आदरणीय पवार साहेब, खा. सुप्रियाताई, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर, माध्यमांचे प्रतिनिधी, सोशल मिडियात व्यक्त होणारी मंडळी यांच्यासह या आंदोलनातील सर्व संयोजक, त्यांचे सर्व सहकारी, क्लास चालक या सर्वांनी दिलेल्या पाठबळाचं हे यश आहे. याबाबत या सर्वांचे आभार! सरकारचा दबाव असतानाही सहकार्याची भूमिका घेतलेले पोलिस प्रशासन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनातून यशस्वी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचेही आभार! आंदोलनादरम्यान, सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घेणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींचेही मनापासून आभार..!

आता सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चौकशी आयोगाकडून वेळेत निष्पक्ष पद्धतीने चौकशी होईल आणि MPSC सारख्या महत्त्वाच्या संस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मुळासकट काढून या संस्थेला पुन्हा पुनर्वेभव प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्याला गुणवत्ता असलेले प्रामाणिक अधिकारी मिळतील, असा विश्वास आहे. या आंदोलनाचा एक भाग होण्याची संधी विद्यार्थ्यांनी विश्वासाने दिली याबाबत त्यांचे मनापासून आभार..!

हेही वाचा..

MPSC पेपरफुटीच्या चौकशीसाठी समिती स्थापन:तुकाराम मुंढे सचिवपदी नियुक्त; अध्यक्ष रजेवर गेले, 10 दिवसांनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

महाराष्ट्र सरकारने राज्य लोकसेवा आयोगात (MPSC) सुधारणा करण्यासाठी रविवारी एक समिती स्थापन केली. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांनी 10 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले.

राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना समिती स्थापन केल्याची माहिती दिली. समितीचे अध्यक्षपद माजी न्यायाधीश दिलीप भोसले भूषवणार आहेत. यात आयपीएस अधिकारी लक्ष्मी गौतम, माजी आयएएस अधिकारी गणेश पाटील आणि निवृत्त न्यायाधीश पी. डी. नाईक यांचाही समावेश आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.