![]()
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी अखेर त्यांना भाजपच्या पंखाखाली आणि त्यांच्याच सावलीत राहावे लागणार आहे. भाजप त्यांना हवा तेवढा सूर्यप्रकाश कधीच मिळू देणार नाही, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेची भाजपला भीती वाटते, या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सध्याच्या राजकारणात विचारसरणीचा कोणताही संबंध उरलेला नाही. लोक स्वतःची नितीमत्ता विकून पक्षांतरे करत आहेत. देश आणि राज्यातील संपूर्ण राजकारण आता केवळ सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर चालवले जात आहे. गुजरातमध्येच सत्ता-संपत्ती एकवटली विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला केवळ 4 ते 5 टक्के कर देणाऱ्या गुजरात राज्यामध्ये आज देशातील सगळी सत्ता आणि संपत्ती एकवटली असल्याचा आरोप त्यांनी केला. ही अत्यंत गंभीर परिस्थिती असून, आगामी काळात आपल्याला ‘एक देश, एक पक्ष आणि निवडणुकाच गायब’ अशा हुकूमशाही परिस्थितीला सामोरे जावे लागते की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारचे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी देशातील तरुण रस्त्यावर उतरला. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तुम्ही काहीही करा, आम्ही तुमचे ऐकणार नाही अशी सध्याच्या सरकारची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीमुळे देशाचे मोठे नुकसान होत असून, आता सरकारच्या पुढच्या कार्यकाळात काय काय पाहायला मिळते, हेच बघावे लागेल.
Source link
देशात 'एक देश, एक पक्ष अन् निवडणूकच नाही' अशी परिस्थिती:राज्यात कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी त्याला भाजपच्या सावलीतच राहावे लागणार- विजय वडेट्टीवार