![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावरून भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देशात काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे या राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी झाले असते. सरसंघचालक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. पण त्यांना पोसणार कोण? आज सगळे देशोधडीला लागलेत. देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना करायचाय का, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरे आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी तुम्हाला मरण नाही. हा आत्मविश्वास आपण गमावत चाललो काय? ठीक आहे, दिवस येतात, दिवस जातात, लोक येतात, लोकं जातात. त्यांची कर्मेही त्यांच्यासोबतच जातात. कुणी कितीही मोठा असला तरी ते चुकत नाही. जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा लोकमान्य टिळक उद्वेगाने म्हणाले होते, काय हे लोक आहेत, त्यांना ना गुलामीची चिड आहे ना स्वातंत्र्याची चाड आहे, कशासाठी काम करायचे? आम्ही जिव तोडून नेतृत्व करत आहोत. तुमच्यासाठी लढत आहोत, पण तुम्ही सोबत येणार आहात का. आज सर्वत्र एक प्रकारची वखवख सुरू आहे. सर्वकाही मलाच पाहिजे अशी वृत्ती सुरू आहे. कुणाला काही वाटत असेल की, तिकडे जाऊन खूप काही मिळेल. पण पहिल्यांदा तिकडे गेलेल्यांचे अनुभव ऐका. आम्ही मागील 58 वर्षांत एकही दिवस कामगारांचा विश्वासघात केला नाही. आम्ही असे कधीच होऊ देणार नाही. कारण, माझे नाते गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे, कंपनीच्या मालकांशी नाही. त्याला जो कुणी हात लावेल, त्याचे तुकडे कसे करायचे ही जबाबदारी तुमची आहे. मी एवढ्या परखडपणे वागत असेल, तर तुम्ही कसे वागले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कामगारांना मायदेशी येऊ वाटत नाही एवढी बिकट परिस्थिती ते पुढे म्हणाले, आज इराण-अमेरिका, इस्त्रायल युद्ध सुरू आहे. दुबईवर बॉम्बफेक झाली. तिथे बिहार व उत्तर प्रदेशातील अनेक लोक काम करतात. सरकारने त्यांना मायदेशी परत येण्याचे आवाहन केले. पण त्यांनी ते धुडकावून लावले. आम्ही भारतात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा इकडे बॉम्ब हल्ल्यात मेलो तरी चालेल असे ते म्हणाले. ही वास्तविकता आहे. ती येथील राज्यकर्त्यांच्या लक्षात कधी येणार की नाही. या लोकांना फक्त राज्य व सत्ता पाहिजे. देतो तुम्हाला. पण एकदा माझ्या कामगारांना रोजगारासाठी वणवण का भटकावे लागत आहे हे आम्हाला सांगा. त्यांच्यावर देश सोडून जाण्याची वेळ का आली. त्यांना युद्धातही घरी परत यावे का वाटत नाही. एवढी बिकट परिस्थिती देशावर आली. पण एकाही राज्यकर्त्याचे डोळे उघडत नाहीत. त्यांच्या डोक्यात काही घुसत नाही. कामगार चळवळ व कामगार कायदे म्हणजे काय. ते कुणासाठी आहेत. कामगार म्हणजे या देशाचा भाग्यविधाता नाही काय. आजपर्यंत जे जे लढे झाले त्या सर्वांत कामगार उतरला नसता, तर कदाचित आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य लांबले असते आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढाही यशस्वी झाला नसता. कारण, गिरणी कामगार व कामगारांच्या लढ्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आला. सरकारला कामगारांचे हे महत्त्व कळत नाही. एकीकडे कामगारांच्या बाजूने बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला कामगारांचे वाटोळे करून टाकायचे हे राज्यकर्त्यांचे लक्षण नाही, असे ते म्हणाले. आम्ही हिंदू, आम्हाला कुठे बुरखे घालता उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांचे बुरखे फाडण्याचा इशारा देत आहेत. अरे, आम्ही हिंदू आहोत. तुम्ही आम्हाला बुरखे कुठे घालता. तुमच्याच डोक्यावर बुरखा आहे. आमच्या नाही. पण लोकसभेत जे काही झाले, ते मुख्यमंत्र्यांनी पाहिले का? विरोधकांवर महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप केला जात आहे. पण महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, हे माझेच स्टेटमेंट आहे. महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, देशाची वाट लावणार होते. त्याचे हे कुभांड विरोधकांनी कसे फोडले, त्यांचा पराभव करून ही लोकशाही वाचवली. काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम योग्यपणे राबवत आहेत. तर काही राज्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. डिलिमिटेशनमुळे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांचे लोकप्रतिनिधित्व कमी झाले असते. सरसंघचालक मोहन भागवत यांचे ठीक आहे, मुले जन्माला घाला. पण पोसणार कोण. नोकऱ्या तुम्ही देणार आहात. कारखाने, मिल बंद पडल्या. सगळे देशोधडीला लागलेत. देश तुम्हाला नुसता बेकारांचा कारखाना करायचाय का? असा तिखट प्रश्न ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ममता वाघिणीसारख्या लढताहेत उद्धव ठाकरे यांनी यावेळी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्या वाघिणीसारख्या लढत आहेत. त्या जिंकल्याच पाहिजेत. त्या एका महिलेला हरवण्यासाठी जवळपास 2 लाखांहून सीआरपीएफचे जवान तैनात केलेत. मणिपूर जळत होते, तेव्हा 30 हजार होते. आता बंगालमध्ये निवडणूक आहेत म्हणून 2 लाख जवान तैनात करण्यात आलेत. काही तर 5 लाख जवान उतरवल्याचा दावा करत आहेत. या स्थितीत मतदान होणार कसे? कोण करणार? नाक्यानाक्यावरच्या फौजा पाहून तुमची मतदानाला जायची हिंमत आहे का? उद्या त्यांनी ठप्पे मारले आणि ममता हरल्या, तर हे तंगड्या वर करून नाचणार. ही लोकशाही आहे? मुख्यमंत्री तिकडे जाऊन प्रचार करत आहेत आणि इकडे राज्यात ड्रग्जचे रॅकेट सुरू झाले. महिलांचे विनयभंग होत आहेत. भोंदूगिरी वाढली. पण आम्हाला त्याचे काहीच नाही. आम्हाला फक्त बंगाल जिकायचाय अशी त्यांची भूमिका आहे. कामगार ओरडत आहे, त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, असे ठाकरे म्हणाले.
Source link
देश तुम्हाला बेकारांचा कारखाना करायचा का?:उद्धव ठाकरे यांचा सवाल; ममता भाजपशी वाघिणीसारख्या लढत असल्याचा दावा