Headlines

दोन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल:खोट्या पंचनाम्याचा अहवाल दडपण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप




खोट्या पंचनाम्याचा अहवाल सादर न करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आणि कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीच्या पायाचे खोदकाम सुरू होते. या कामाचा पंचनामा तलाठी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर तक्रारदारांनी तब्बल ३२०० ब्रास जादा खोदकाम केल्याचे सांगून सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याची भीती दाखविण्यात आली. हा अहवाल सादर न करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीची पडताळणी एसीबीने केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकोटे (वय ३७) आणि कोतवाल महेश मधुकर मुंडे (वय ३०) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *