Headlines

पुणे महात्मा फुले मंडईतील गाळेधारकांवर भाडेवाढ:नगरसेवक राघवेंद्र मानकर यांची पुनर्विचार करण्याची मागणी




पुणे शहरातील ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील २२०० गाळेधारकांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप आणि मागील काही वर्षांतील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन न्याय्य व परवडणारे भाडे निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे. कोविड-१९ महामारी, दीर्घकाळाचे लॉकडाऊन, ग्राहकसंख्येत झालेली घट तसेच मंडई परिसरातील मेट्रो कामांमुळे येथील व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या आर्थिक अडचणींमधून गाळेधारक अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत वाढीव भाड्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडत असल्याचे मानकर यांनी नमूद केले. या मागणीसंदर्भात त्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी महात्मा फुले मंडई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कासूर्डे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मानकर यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे प्रमुख मागणी केली आहे की, २२०० गाळेधारकांच्या भाडेवाढीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तसेच, कोणतेही भाडे निश्चित करण्यापूर्वी गाळेधारकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. कोरोना महामारी आणि विविध कारणांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या गाळेधारकांच्या २०२१ ते २०२५ या ५ वर्षांतील थकीत भाड्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती सवलत द्यावी आणि थकीत भाडे हप्त्यांमध्ये भरण्याची सोय करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर म्हणाले, “महात्मा फुले मंडईचे ऐतिहासिक आणि वैभवशाली स्वरूप जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांचे हित जपणेही आवश्यक आहे. मुंबई व दिल्ली येथील भाडेनिश्चितीच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात यावा. गाळेधारकांवर एकतर्फी आर्थिक भार न टाकता त्यांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे ऐकून न्याय्य निर्णय व्हावा, ही आमची भूमिका आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *