Headlines

धाकट्या पंढरीत विठ्ठलभक्तीचा जागर:धामणगावात आज कीर्तन; महाराष्ट्र अन् कर्नाटकातील भाविकांची असणार उपस्थिती‎




वैराग धामणगाव या संतभूमीत आज (३ जुलै) संत माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी पर्वणीचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत म्हणून ओळख असलेल्या संत माणकोजी महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार करत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यामुळे धामणगावला ‘धाकटी पंढरी’ अशी ओळख मिळाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही समाधी पर्वणीसाठी भाविकांची गर्दी होणार आहे. संत माणकोजी महाराजांनी धामणगावात भक्तीचा असा दीप प्रज्वलित केला की हे गावच ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कीर्तनसेवेत साक्षात भगवान विठ्ठल सहभागी होत असल्याच्या कथा वारकरी संप्रदायात आजही श्रद्धेने सांगितल्या जातात. त्यांच्या शिष्यपरंपरेने महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेशातही विठ्ठलभक्तीचा वारसा जतन केला आहे. शके १६१६, ज्येष्ठ वद्य तृतीया (३१ मे १६९४) रोजी संत माणकोजी महाराजांनी योगमुद्रेत संजीवन समाधी स्वीकारली.त्यांच्या समाधीस्थळी दरवर्षी समाधी पर्वणी साजरी केली जाते.या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहून संतांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतात. त्यांच्या शिकवणीतील भक्ती, आणि समाजसेवेचा संदेश आजही प्रेरणा देत आहे. धामणगाव नगरीतील भाविकांत भक्तिमय वातावरण इ.स. १६०४ मध्ये जन्मलेल्या संत माणकोजी महाराजांनी कीर्तन, नामस्मरण, समाजसेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा व्यापक प्रचार केला. अखंड विठ्ठलनामाच्या साधनेतून त्यांना पांडुरंगाचे साक्षात दर्शन झाल्याची श्रद्धा असून, त्यानंतर त्यांना ‘बोधले’ हे नाव प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यांची दानशूर वृत्ती, वारकरी परंपरेप्रती असलेली निष्ठा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश आजही भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पवित्र समाधी पर्वणीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत माणकोजी महाराजांच्या चरणी भक्तिभाव अर्पण करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाधी पर्वणीमुळे धामणगाव नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी, भाविक आणि संतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० ते १२ या वेळेत श्रद्धेय सद्गुरू प्रभाकरदादा महाराज बोधले यांचे पुष्पवृष्टीचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनातून संत माणकोजी महाराजांच्या जीवनकार्याचा आणि भक्तिमार्गाचा गौरवपूर्ण आढावा मांडला जाणार असून, भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *